फलटण : पिंप्रद ता. फलटण येथील एका ३८ वर्षीय युवकाचा मृतदेह फलटण-गिरवी मार्गावरील माळरानात संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्रद येथील नीलेश भगवान जाधव (वय ३८) हे शनिवारी (दि. १) सायंकाळी पाचच्या सुमारास दुचाकीवरून घराबाहेर पडले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी व नातेवाइकांनी परिसरात शोध घेतला; मात्र त्यांचा सुगावा लागला नाही. रविवारी (दि. २) सकाळी फलटण-गिरवी रस्त्यावरील जाधववाडीनजीक महादेवमळा परिसरातील माळरानात एका गुराख्याला मृतदेह दिसल्याने त्याने तत्काळ फलटण शहर पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, मृतदेहावरील कपड्यांची स्थिती संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सदर मृतदेह नीलेश जाधव यांचा असल्याचे स्पष्ट झाले. हा मृत्यू अपघाती आहे की यामागे अन्य काही कारण आहे, या दिशेने फलटण शहर पोलिस तपास करत आहेत. या प्रकरणी नीलेश यांचे धाकटे बंधू पोपट भगवान जाधव यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.