मोती चौकात वाहन उभे करण्यावरून तुफान बाचाबाची ; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

by Team Satara Today | published on : 02 August 2026


सातारा : शहरातील मोती चौक येथे रविवारी दुपारी वाहन उभे करण्याच्या कारणावरून दोन दुचाकीस्वारांमध्ये झालेला वाद काही क्षणांतच हातघाईवर आला. भरदिवसा गजबजलेल्या चौकात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, वाहतूक पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी पार्क करण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. हा वाद वाढत जाऊन दोघांनी एकमेकांवर लाथाबुक्क्यांनी हल्ला केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेमुळे रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक आणि महिलाही काही काळ घाबरून गेल्या.

घटनेच्या वेळी वाहतूक नियमनाची जबाबदारी सांभाळत असलेले वाहतूक शाखेचे कर्मचारी सुहास पवार आणि रमेश शिखरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही व्यक्तींना वेगळे केले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे वाद आणखी विकोपाला जाण्यापासून रोखण्यात यश आले.

मोती चौक हा शहरातील महत्त्वाचा आणि कायम वर्दळीचा परिसर असल्याने येथे वाहन पार्किंगवरून वारंवार वाद निर्माण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रस्त्यालगत अतिक्रमण, दुकानांसमोरील अनधिकृत अडथळे आणि अपुर्‍या पार्किंग सुविधेमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नियमभंग करणार्‍या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई होत असली तरी या परिसरासाठी स्वतंत्र आणि शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याची गरज नागरिकांनी पुन्हा अधोरेखित केली आहे. तसेच अतिक्रमण आणि बेकायदा पार्किंगविरोधातील मोहीम अधिक प्रभावी करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी अन्य दोन महिलांवर गुन्हा
पुढील बातमी
क्रांतीची गाथा सांगणार्‍या ‘पत्री सरकार 1942’चे पहिले पोस्टर प्रदर्शित

संबंधित बातम्या