सातारा : लिंब (ता. सातारा) येथे शोषखड्ड्यात पडल्यामुळे चार वर्षांच्या चिमुरड्याचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हर्ष स्वप्निल लोंढे (वय ४, मूळ रा. बेलावडे, ता. जावली) असे मृत बालकाचे नाव आहे.
हर्ष लिंब येथील बिडीवाल्याचा मळा येथे आपल्या आजोळी गेल्या दहा दिवसांपासून आला होता. शुक्रवारी तो आपल्या आजीसोबत शेतात फिरण्यास गेला होता. शेतातील रस्त्यावरून परत घरी येत असताना अचानक पाय घसरल्याने हर्ष बाजूला असलेल्या शोषखड्ड्यात पडला. सुमारे १० ते १२ फूट खोल असलेल्या या खड्ड्यातील पाणी आणि चिखलाच्या राड्यात अडकल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला. हर्ष सैन्यात कार्यरत असलेल्या आपल्या वडिलांसोबत शुक्रवारी पुण्याला जाणार होता; मात्र त्याआधीच त्याच्यावर काळाने घाला घातला. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस हवालदार आशिष कुमठेकर पुढील तपास करत आहेत.