महाबळेश्वर : महाबळेश्वर–तापोळा मार्गावरील फळणे वस्ती परिसरात मुसळधार पावसामुळे खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती अखेर चौथ्या दिवशी पूर्ण झाली असून गुरुवारी दुपारी सुमारे चार वाजता हा मार्ग हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे तापोळा खोऱ्यातील १०५ हून अधिक दुर्गम व अतिदुर्गम गावांचा महाबळेश्वरशी तुटलेला संपर्क पुन्हा पूर्ववत झाला असून हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे फळणे वस्ती परिसरात मुख्य रस्ता मोठ्या प्रमाणावर खचला होता. तब्बल १० ते १५ फूट खोल खड्डा पडल्याने वाहनांची वाहतूक तर बंद झालीच, पण पायी चालण्यासाठीही जागा उरली नव्हती. परिणामी तापोळा विभागाचा महाबळेश्वरशी पूर्ण संपर्क तुटला होता. दररोज कामानिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. अनेकांनी वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभी करून भर पावसात पायपीट करत प्रवास केला.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या. खचलेल्या रस्त्यालगत असलेल्या भोईमिया बंगल्याची संरक्षक भिंत काही प्रमाणात हटवून तेथून पर्यायी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मार्गावर खडी, मुरूम टाकून काम सुरू करण्यात आले. मात्र सततचा पाऊस व चिखलामुळे अडचणी निर्माण होत असल्याने पुढे मुख्य खचलेल्या भागात मोठमोठे दगड, डबर व खडी टाकून भराव करण्यात आला. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह कायम राहावा यासाठी भरावाखाली मोठे पाइपही टाकण्यात आले.
पालिकेकडे मनुष्यबळ व यंत्रसामग्री मर्यादित असतानाही प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरू ठेवले. या कामासाठी सलग दोन दिवस नगरसेवक संतोष शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ, पालिकेच्या बांधकाम विभागाचे एम. आर. धायगुडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिकांनी भर पावसात अथक परिश्रम घेतले. वाई येथून डंपरच्या साहाय्याने मोठे दगड व डबर मागवून कामाला वेग देण्यात आला.
दरम्यान, तहसीलदार सचिन मस्के यांनी घटनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनीही संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत रस्ता लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर गुरुवारी दुपारी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली. तापोळा खोऱ्यातील नागरिकांची चार दिवसांची पायपीट थांबली असून दैनंदिन व्यवहार पुन्हा सुरळीत होण्यास मदत झाली आहे. मात्र, पावसाचा जोर कायम असल्याने या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.