पाटण : गव्यांसह रानडुकरांचे कळप जंगलाबाहेर पडल्याने विभागातील डोंगर पट्ट्यासह इतर गावांतील शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. वाल्मीक परिसर व पठाराखालील गावांतही गव्यांचा मोर्चा वळल्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. वन विभागाने वन्यप्राण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
वाल्मीक खोऱ्याचा परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असून, पूर्वीपासूनच तेथे बिबट्या, गवे, रानडुकरे आदी वन्य प्राण्यांचा उपद्रव कायम असल्याने शेती आणि तिच्यावरच उपजीविका असलेली कुटुंबे पूर्णतः अडचणीत सापडली आहेत. पेरणीपासून पीक काढणीपर्यंत गव्यांचे व डुकरांचे कळप पाठ सोडत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. गव्यांचे कळप जंगलाबाहेर पडल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. गाव-शिवारात रात्रंदिवस चरणारे कळप छातीत धडकी भरवत असल्याचे शेतकरी सांगतात.
खरीप हंगाम असो किंवा रब्बी. गवे, डुकरे, वानरांच्या कळप शेतात घुसून मोठे नुकसान करत असल्याने शेती करणे अवघड झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेती करणे बंद करून मुंबईचा रस्ता धरला आहे.