जिल्हा बँक निवडणुकीची रंगीत तालीम सुरू; आखाडेतील घडामोडींनी राजकीय समीकरणांना वेग

by Team Satara Today | published on : 30 July 2026


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध विकास सोसायट्यांमध्ये ठराव मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, त्यातून स्थानिक पातळीवरील राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. आखाडे गावात ठरावाच्या प्रक्रियेदरम्यान निर्माण झालेल्या घडामोडींनी निवडणुकीतील राजकीय चुरस अधिक स्पष्ट केली.

ठरावाच्या प्रक्रियेदरम्यान दोन गटांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला. या घडामोडीची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

भोसले यांनी दोन्ही बाजूंची भूमिका ऐकून संयम राखण्याचे आवाहन केले. त्यांच्या हस्तक्षेपानंतर निर्माण झालेला तणाव निवळला आणि ठरावाची प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली. अखेरीस संबंधित सोसायटीचा ठराव मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बाजूने मंजूर झाल्याची माहिती पुढे आली.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी 5 ऑगस्टपर्यंत प्रारूप मतदार यादीची प्रक्रिया सुरू असून, विविध मतदारसंघांतील ठरावांवर सर्वच प्रमुख राजकीय गटांचे लक्ष केंद्रित झाले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत अशा राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणासाठी प्रत्येक सोसायटीचा ठराव महत्त्वाचा ठरत असल्याने स्थानिक पातळीवरील हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बासुंदीच्या गुणवत्तेवर ग्राहकाचे प्रश्नचिन्ह; अन्न व औषध प्रशासनाकडे लेखी तक्रार, उत्पादनातून दुर्गंधी येत असल्याचा आरोप
पुढील बातमी
गुटखा विक्री प्रकरणी सातारा शहरातील दोन पानपट्टी चालकांवर गुन्हे

संबंधित बातम्या