फलटणजवळ स्फोटकांचा मोठा साठा जप्त; 5000 हून अधिक स्फोटकांच्या कांड्यांसह ट्रक सील

by Team Satara Today | published on : 30 July 2026


फलटण : फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरड येथील रांजणी पुनर्वसन भागातील बंद मराठी शाळेच्या मैदानाजवळ छापा टाकून पोलिसांनी बेकायदेशीर स्फोटकांनी भरलेला दहाचाकी ट्रक जप्त केला आहे. ही कारवाई काल दि. 29 रोजी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक 29 रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत स्फोटकासंदर्भात माहिती मिळाली.

भुजबळ यांनी त्याबाबत पोलीस उपनिरीक्षक सुबनावळ, पोलीस उपनिरीक्षक मठपती, पोलीस नाईक अभंग, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांना बातमीच्या अनुषंगाने संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई करण्याची सूचना केली.

त्याप्रमाणे तपास पथक बरड, ता. फलटण गावच्या हद्दीतील रांजणी पुनर्वसन येथे बंद शाळेच्या मैदानामध्ये उभ्या असलेल्या बंदिस्त बॉडीच्या ट्रकच्या (क्र. एमएच 11 सीएच 2555) येथे गेले. पथकाने ट्रकच्या जवळ जाऊन पाहिले असता तिथे एक जण उभा होता त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव हेमराज महावीर जाट रा. सरोस भिलवाडा, राजस्थान, सध्या रा. बरड, फलटण असे सांगितले. ट्रक मध्ये काय आहे असे विचारले असता ट्रकमध्ये स्फोटकांच्या कांड्यांचे बॉक्स आहेत, असे त्याने सांगितल्याने पथकाने पथकाने त्याला मागील दरवाजा उघडण्यास सांगितले. ट्रकच्या पाठीमागचा दरवाजा उघडून त्यामध्ये पाहिले असता ट्रक मध्ये सुमारे 5300 लहान मोठ्या स्फोटकांच्या कांड्या आढळून आल्या. पोलीस निरीक्षक राजकुमार भोसले आणि त्यांच्या पथकाने दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत ही कारवाई केली. 

ट्रकची पाहणी केली असता त्यात इकोप्रिम 83 मिमी चे 500 बॉक्स (किंमत 9,64,001/-) आणि सुपरपॉवर 90 चे 4 बॉक्स (किंमत 8,000/-) असे एकूण 504 बॉक्स आढळले. या स्फोटकांची आणि 15 लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण 24,72,001 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फॉरेन्सिक तपासणीसाठी दोन्ही स्फोटकांचे नमुने (सॅम्पल्स) जप्त करून उर्वरित साठा सुरक्षिततेच्या कारणास्तव मॅगझिनमध्ये ठेवण्यात आला आहे.

तपासादरम्यान संशयिताने सांगितले की, हा स्फोटकांचा साठा शंकरलाल बेनीराम जाट (रा. बरड, फलटण) यांच्या मालकीचा आहे. कोणत्याही परवान्याशिवाय किंवा कायदेशीर कागदपत्रांशिवाय हा धोकादायक साठा मानवी वस्तीजवळ निष्काळजीपणे उभा करून ठेवण्यात आला होता.

याप्रकरणी पोलीस अंमलदार अमोल किसन चांगण यांच्या तक्रारीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात शंकरलाल बेनीराम जाट आणि हेमराज महावीर जाट यांच्याविरोधात बेकायदेशीरपणे स्फोटके बाळगणे आणि सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुबनावळ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याला धक्काबुक्की व दमदाटी; दोघांवर फलटण शहर पोलिसांत गुन्हा दाखल
पुढील बातमी
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या; साहित्य क्रांती ज्योत दिंडीचे सातार्‍यात जल्लोषात स्वागत

संबंधित बातम्या