फलटण : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्य बजावत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जगन्नाथ रूपनवर यांना कॉलर धरून धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सातारा येथील प्रसाद प्रदीप कोंडेदेशमुख आणि काळ्या रंगाचा सफारी घातलेला त्याचा अज्ञात साथीदार या दोघांविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपजिल्हा रुग्णालयात २८ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास शस्त्र परवान्यासाठी (वेपन लायसन्स) वैद्यकीय प्रमाणपत्र (फिट फॉर सर्टिफिकेट) मागण्यासाठी आरोपी आले होते. त्यावेळी डॉ. रूपनवर यांनी ओ.पी.डी. ची वेळ संपल्याचे सांगून तातडीचे रुग्ण तपासणीचे काम सुरू असल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी येण्याची विनंती केली.
यावरून संतापलेल्या आरोपींनी वैद्यकीय अधीक्षक दालनात वैद्यकीय अधिकाऱ्याशी हुज्जत घालून अरेतुरेची भाषा केली. याच दरम्यान काळ्या रंगाचा सफारी घातलेल्या इसमाने डॉक्टरांची कॉलर धरून त्यांना दरवाजापर्यंत ढकलत धक्काबुक्की केली व हिंदीतून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच प्रसाद कोंडेदेशमुख यानेही 'उद्या सकाळी समजेल मी कोण आहे' अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेनंतर डॉ. रूपनवर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस उपनिरीक्षक विजयमाला गजरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.