लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणार; ‘हेअर कट’मुळे संभ्रम नको: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

by Team Satara Today | published on : 30 July 2026


पुणे : राज्यातील ज्या शेतकऱ्यांची थकीत कर्ज रक्कम २ लाखांपर्यंत आहे, त्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे. ''हेअर कट''मुळे कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याचे किंवा काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, संबंधित बँकांशी समन्वय साधून या सर्व तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात येत असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (पीडीसीसी) बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पहिल्या टप्प्यातील १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांपैकी सुमारे पाच लाख शेतकऱ्यांची ईकेवायसी पूर्ण झाली आहे. 'हेअर कट' म्हणजे राज्य शासन आणि बँका यांच्यातील आर्थिक समझोता असून, कर्जमाफीमध्ये सरकार आणि बँकांनी किती रक्कम उचलायची याचे सूत्र आहे.

याचा अर्थ शेतकऱ्यांचे कर्ज कमी करणे असा नसून, सरकार आणि बँका यांच्यातील कर्ज रकमेचा आर्थिक वाटा निश्चित करणे हा त्यामागील उद्देश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यातील प्रत्यक्ष थकीत रक्कम आणि शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीतील रक्कम यामध्ये तफावत दिसून येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात माझे संपूर्ण कर्ज माफ झाले का नाही? असा संभ्रम निर्माण झाला आहे.

मात्र, शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. कर्जमाफीच्या यादीत कमी दिसणारी उर्वरित रक्कम संबंधित राष्ट्रीयीकृत बँकांकडून नियमानुसार वर्ग केली जाणार असून, पात्र शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्ज नील झाल्याचे प्रमाणपत्र मिळणार असून, दुसऱ्याच दिवशी पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देण्याच्या सूचना बँकांना दिल्याचे भरणे म्हणाले.

हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्या घरी जाऊन पेढा भरवणार

राज्यात एल निनोमुळे पाऊस कमी राहणार, असे चित्र मे महिन्यात निर्माण झाले होते. त्यावेळी ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी एल निनो असला तरी पर्जन्यमान चांगले होण्याचा अंदाज सुरुवातीसच आपणासमोर वर्तविला होता आणि तो अंदाज खरा ठरत असल्याबद्दल विचारले असता, कृषिमंत्री भरणे म्हणाले, मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना पेढा भरवणार आहे. पुरस्काराबद्दल नंतर विचार करू, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तपासाच्या नावाखाली विश्रामबाग पोलिसांचा सातारा पर्यटनाचा प्रकार समोर; महिला अधिकाऱ्यासह तिघांवर कारवाई
पुढील बातमी
राज्यातील सर्व शाळांच्या ५० मीटर परिसरात कोल्ड्रिंक्स व अन्य जंकफूडची विक्री करता येणार नाही - ‘एफडीए’ आयुक्त तुकाराम मुंढे

संबंधित बातम्या