सातारा : वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘नीट’ (NEET) परीक्षेत सातारा जिल्ह्यातील गोवे येथील अथर्व देवीदास बागल (वय १८) याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पहिल्याच प्रयत्नात ७२० पैकी ६३१ गुण मिळवत त्याने वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. सातारा जिल्ह्यात अव्वल गुण मिळवल्याने विविध क्षेत्रातून काैतुक हाेत असून अभिनंदन हाेत आहे.
सामान्य कुटुंबातून आलेल्या अथर्वने प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत हे यश मिळवले. आई-वडील दाेघे सुध्दा डाॅक्टर आहेत. त्यामुळे आई-वडिलांच्या सेवाभावी कार्यातून प्रेरणा घेत अथर्वने डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. आगामी कालावधीत सुध्दा पडेल ते कष्ट घेण्याची जिद्दी उराशी बाळगले आहे.
अथर्वचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ग्रामीण भागात झाले. पहीले ते दहावी लिंब येथील गिरीशंकर महाविद्यालयात पूर्ण केले. ११ वी, १२ सातारा येथील काॅलेजमध्ये पूर्ण केले. त्यानंतर ग्रामीण भागीतून राेज २० किलाे मीटर प्रवास करुन वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार करून ‘नीट’ परीक्षेची जिद्दीने तयारी केली. सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे काटेकोर नियोजन आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर त्याने अपेक्षेपेक्षाही अधिक गुण मिळवत यश मिळवले.
अथर्वच्या या यशामुळे त्याचे आई-वडील, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षांव केला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही चिकाटी, शिस्त आणि कुटुंबाच्या पाठबळाच्या जोरावर मोठे यश मिळवता येते, हे अर्थवच्या प्रवासातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
"आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार"
"माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत आई-वडिलांचा सर्वांत मोठा वाटा आहे. त्यांनी माझ्यासाठी घेतलेले कष्ट आणि केलेले त्याग हेच मला सातत्याने प्रेरणा देत राहिले. ‘नीट’ परीक्षेसाठी रात्रंदिवस केलेल्या मेहनतीचे आज चीज झाले आहे. आता डॉक्टर बनून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे आणि समाजासाठी काम करणे हेच माझे पुढील ध्येय आहे," असे अथर्व बागल यांनी सांगितले.