सातारा : जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालय, सातारा येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी चला, हिपॅटायटिसबाबतचे गैरसमज दूर करूया "Hepatitis: Let's Break It Down" या जागतिक संकल्पनेनुसार हिपॅटायटिसविषयी जनजागृती, तपासणी आणि लसीकरणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. अतुल लिपारे अति. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी नागरिकांना हिपॅटायटिसची वेळेत तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. हिपॅटायटिस हा अनेकदा लक्षणे न दिसणारा, लपून राहणारा आजार आहे. त्यामुळे जनजागृती, नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार हाच या आजारापासून बचावाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. हिपॅटायटिसमुळे यकृतावर गंभीर परिणाम होऊन लिव्हर सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सरचा धोका वाढू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने तपासणी करून आवश्यकतेनुसार लसीकरण करून घ्यावे, असे त्यांनी सांगितले.
या विशेष उपक्रमांतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांचे हिपॅटायटिस लसीकरण, जिल्हा कारागृहातील बंदीजनांची तपासणी व लसीकरण, गरोदर मातांची तपासणी तसेच विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. समाजातील प्रत्येक घटकाच्या सक्रिय सहभागातूनच हिपॅटायटिसमुक्त समाजाची निर्मिती शक्य असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ उल्का झेंडे , अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अतुल लिपारे, निवासी वैद्यकीय अधिकारी तथा कावीळ नियंत्रण विभागाच्या नोडल अधिकारी डॉ स्मिता लोंढे, सहाय्यक अधिसेविका प्रतिभा चव्हाण तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भोसले उपस्थित होते.
कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सूत्रसंचालन विकास शेंडगे यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार राष्ट्रीय विषाणूजन्य हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रम (NVHCP) लॅब टेक्निशियन रुपाली कदम यांनी मानले.