नवी दिल्ली : NEET पेपर लीकविरोधात दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईवरून संसदेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. मला संसदेत बोलण्याची परवानगी देण्यात आली नाही, म्हणूनच मी पत्रकारांसमोर येऊन देशवासीयांशी संवाद साधत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
संसदेत आवाज दाबण्याचा प्रयत्न
पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, विरोधी पक्षनेता म्हणून लोकसभेत जनहिताचे मुद्दे मांडणे हा माझा घटनात्मक अधिकार आहे. मी अध्यक्षांना वारंवार मला बोलू देण्याची विनंती केली, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा केली; मात्र मला संसदेत बोलू दिले गेले नाही. संसदेत मला बोलता आले नाही, तेच मुद्दे मी आता येथे मांडत आहे.
विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार
दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईवर बोलताना त्यांनी धक्कादायक दावे केले. दिल्लीत विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार करण्यात आला. त्यांना मारण्यासाठी साध्या लाठ्यांचाच नाही, तर खिळे लावलेल्या लाठ्या आणि 'शॉक बॅटन'चा वापर करण्यात आला. शिवाय, आंदोलक विद्यार्थ्यांवर 'पॅलेट गन' चालवण्यात आली. यात एका विद्यार्थ्याचा डोळा कायमचा जाण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. मी स्वतः एम्सच्या डॉक्टरांचे मेडिकल सर्टिफिकेट पाहिले आहे, असा दावा त्यांनी केला.
माफी मागणार नाही, सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी
राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, मला संसदेत असे सांगण्यात आले होते की, जर मी माफी मागितली तर मला बोलू दिले जाईल. परंतु, मी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) कधीही माफी मागणार नाही. विद्यार्थ्यांवरील कारवाईची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी व्हावी.