खंडाळा : आलिशान कारमधून आलेल्या एका टोळीने पहाटेच्या सुमारास खंडाळ्यातील एटीएम मशिन फोडून दोन लाख ३४ हजार ४०० रुपये लंपास केल्याची घटना घडली. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर कलर स्प्रे मारल्याने चेहरे व चोरट्यांची संख्या अद्याप स्पष्ट झाली नाही.
बुधवारी (दि २९) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश केला. चेहरे दिसू नयेत म्हणून सीसीटीव्हीवर कलर स्प्रे मारले, सायरनवाजू नये म्हणून वायर तोडून गॅस कटरच्या साह्याने एटीएम मशिन फोडून दोन लाख ३४ हजार ४०० रुपयांची रोकड लंपास केली. अवघ्या १० ते १५ मिनिटात गुन्हा करून पलायन केल्याने चोरटे सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, एटीएम तोडल्याने अलार्म हैदराबाद येथील मुख्य शाखेत वाजला. घटनेची माहिती कळताच फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी धन्यकुमार गोडसे, खंडाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष म्हस्के व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक विभागही दाखल झाले.
बँकेतील अधिकारी मेरी सिन्हा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खंडाळा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष म्हस्के हे करीत आहेत.