ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 'पीएम यशस्वी' शिष्यवृत्ती योजना; शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा

by Team Satara Today | published on : 29 July 2026


पुणे: भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 'पीएम यशस्वी' शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना येत्या ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या योजनेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे. अकरावीपर्यंतच्या अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य मिळाल्याने विद्यार्थी स्वतंत्रपणे शिक्षण घेऊ शकतील आणि भविष्यात उज्ज्वल करिअर घडवू शकतील, असे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

ही शिष्यवृत्ती केवळ भारतीय विद्यार्थ्यांनाच उपलब्ध असून, त्याचा लाभ घेण्यासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत खुली राहील. शाळास्तरावरील पडताळणी १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत, तर जिल्हा आणि राज्यस्तरावरील पडताळणी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होईल. या प्रक्रियेत शाळा प्रशासनान सहकार्य करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.

...असा करता येणार अर्ज

योजनेच्या पात्रतेनुसार विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल scholarships.gov.in वर ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. प्रथम 'नवीन नोंदणी करून ॲप्लीकेशन आयडी आणि पासवर्ड घ्यावा. त्यानंतर फ्रेश लॉगीन अंतर्गत अर्ज भरणे सुरू करावे. अर्जात वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील आणि बँक खाते माहिती भरावी.

जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, गुणपत्रिका, प्रवेश प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि बँक पासबुकची प्रत पीडीएफ किंवा जेपीजी स्वरूपात अपलोड करावी. अर्ज अंतिम सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी, कारण एकदा सबमिट केल्यानंतर बदल करता येत नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर; १६.९६ लाख शेतकऱ्यांना मिळणार १३,६०० कोटींचा लाभ
पुढील बातमी
औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाला वेग; तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डेंची तब्बल साडेसहा तास चौकशी

संबंधित बातम्या