साहित्यरत्न, लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त डॉ. शरद गायकवाड यांचे रविवारी व्याख्यान, संबोधी प्रतिष्ठानचे वतीने आयोजन

by Team Satara Today | published on : 28 July 2026


सातारा -   साहित्यरत्न, लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त  येत्या रविवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी ११  वाजता पाठक हॉल मध्ये  पुरोगामी  चळवळीतील कार्यकर्ते, प्रसिद्ध साहित्यिक, संशोधक, अभ्यासक  डॉ. शरद गायकवाड( कोल्हापूर) यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले आहे, अशी माहिती संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश इंजे व उपाध्यक्ष प्रा. प्रशांत साळवे यांनी दिली.

झुंजार लेखक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे बिनीचे कार्यकर्ते,वंचित शोषित समाजाचे नायक अण्णा   भाऊ  साठे  यांचे पुरोगामी विचार व  चळवळीतील दुर्लक्षित मौलिक  योगदान आजच्या परिस्थितीत  लोकांसमोर आणणे गरजेचे आहे. या हेतूने संबोधी प्रतिष्ठानचे वतीने विशेष कार्यक्रम छत्रपती प्रतापसिंह महाराज ( थोरले ) नगरवाचनालयाच्या पाठक हॉल मध्ये आयोजित करण्यात आला आहे. संबोधी  प्रतिष्ठानचे संघटक  दिनकर झिंब्रे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात  " लोकशाहीर,कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचे अलौकिक  क्रांतिकार्य व विचाराची प्रस्तुतता " या विषयावर  डॉ. शरद गायकवाड बोलणार आहेत.

या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संबोधी प्रतिष्ठानचे कार्यवाह ॲड. हौसेराव धुमाळ, सहकार्यवाह डॉ. सुवर्णा यादव, कोषाध्यक्ष यशपाल बनसोडे, विश्वस्त अनिल बनसोडे, केशवराव कदम, अशोक कांबळे, प्रकाश गायकवाड, अशोक भोसले व डॉ. जयपाल सावंत यांनी केले आहे.

संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने  दहावी, बारावी मध्ये उज्वल यश संपादन करणाऱ्या सातारा शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा गेले सतरा वर्षापासून गौरव करण्यात येत आहे. या वर्षीच्या 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या गौरव समारंभासाठी 90% च्या वर गुण प्राप्त केलेल्या अनुसूचित जाती जमाती,भटके विमुक्त, व्हीजेएनटी, ओबीसी विद्यार्थ्यांनी वरील समारंभावेळी नावे नोंदवावीत,असे आवाहन संबोधी  प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानाचे मॉडेल राज्यात राबविण्यात येणार - मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन समिती'

संबंधित बातम्या