खेड शिवापूरच्या १ कोटींचा दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्याचे ते २ पोलिस निलंबत; यातील महिला पोलिस अंमलदार मूळची साताऱ्यातील

by Team Satara Today | published on : 28 July 2026


धायरी : सिंहगड रस्त्यावरील ब्रम्हा हॉटेल ते खेड शिवापूर पोलिस चौकीदरम्यान भरदिवसा घडलेल्या १ कोटी रुपयांच्या दरोड्याच्या प्रयत्नात असणाऱ्या कथित पत्रकार आशिष तिवारी याला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या गुन्ह्यात थेट राजगड पोलीस ठाण्याच्या २ पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे समोर आले असून, सद्य:स्थितीला पोलिसांसह इतर ६ आरोपी फरार आहेत. आता त्या दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक अजिज जब्बार इसुब मेस्त्री (वय ३९, नेमणूक राजगड पोलिस ठाणे) आणि महिला पोलिस अंमलदार प्रमिला शरद निकम (४४, रा. विसावा कॅम्प, सातारा) अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे फरार असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच अभिजीत ऊर्फ बटऱ्या बाळासाहेब गाडे (रा. आंबेडकर वसाहत, धायरी) दाऊद सय्यद नदाफ (रा. बेनकर वस्ती, धायरी) आकाश ऊर्फ मुन्ना संजय गायकवाड (३२, रा. कासुर्डी, भोर) प्रमोद विजयकुमार यादव (२०, रा. गाउडदरा फाटा, हवेली) हे आरोपी देखील फरार आहेत.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांच्या कारचा पाठलाग करताना आशिष तिवारी हा त्याच्या दुचाकीवरून जाताना स्पष्ट दिसला. इतकेच नव्हे, तर लुटलेली रक्कम सुरुवातीला आशिषच्याच दुचाकीमध्ये ठेवण्यात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणातून समोर आले. या भक्कम पुराव्याआधारे नऱ्हे पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

खाकी वर्दीला डाग; पोलिस दलातील दोन मोठे मासे फरार...

पोलिस आणि पत्रकार यांच्यातील असलेले लागेबांधे याबाबत या घटनेने शिक्कामोर्तब केले आहे. या गुन्ह्यात कथित पत्रकारासह एकूण चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर उर्वरित सहा आरोपी अजूनही फरार आहेत. यामध्ये राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक अजिज जब्बार इसुब मेस्त्री (वय ३९, नेमणूक राजगड पोलिस ठाणे) आणि महिला पोलिस अंमलदार प्रमिला शरद निकम (४४, रा. विसावा कॅम्प, सातारा) या दोघांचा थेट सहभाग निष्पन्न झाला आहे. गुन्हा उघडकीस आल्यापासून हे दोन्ही पोलिस कर्मचारी फरार असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

काय होते नेमके प्रकरण...

१८ जुलै २०२६ रोजी व्यावसायिक हर्षवर्धन पवार हे त्यांचे सहकारी किरण आपटे यांच्यासोबत कारमधून १ कोटी रुपयांची रोकड बँकेत भरण्यासाठी जात होते. यावेळी आरोपींनी पोलिस असल्याची बतावणी करून गाडी अडवली आणि १ कोटी रुपयांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. पवार यांनी दाखवलेल्या धाडसामुळे आणि प्रतिकारामुळे हा दरोड्याचा प्रयत्न फसला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी यापूर्वीच विक्रम चाकणकर (४४), अमेय अरविंद कार्ले (४६) आणि गणेश रमेश कदम (३३, सर्व रा. धायरी) या तिघांना अटक केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या १८ वर्षांखालील आंदोलक विद्यार्थ्यांना तातडीने सोडा; सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्रासह ७ राज्यांना कडक आदेश

संबंधित बातम्या