महाबळेश्‍वर तालुक्यात पावसाची संततधार कायम; देवसरे गावातील शेतकऱ्याच्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान

by Team Satara Today | published on : 28 July 2026


महाबळेश्‍वर : महाबळेश्‍वर तालुक्यात पावसाची संततधार कायम असून मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पडझडीच्‍या घटना घडल्‍या आहेत. या पावसाने महाबळेश्‍वर-तापोळा मार्ग पुन्हा एकदा खचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर आंबेनळी घाटात सलग तिसऱ्यांदा दरड कोसळल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. दुसरीकडे दुर्गम देवसरे गावातील एका शेतकऱ्याच्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

महाबळेश्वर येथे १ जून ते २७ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ३ हजार ६२१.६ मिमी (१४२.५८ इंच) पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने जनजीवनावर परिणाम झाला.

महाबळेश्‍वर-तापोळा मार्गावरील फळणे वस्ती परिसरातील रस्ता शनिवारी खचला होता. नगरपालिकेने खडी, मुरूम आणि माती टाकून तात्पुरती दुरुस्ती केली; मात्र ही उपाययोजना काही तासांतच निष्प्रभ ठरली. सोमवारी सकाळी त्याच ठिकाणी रस्ता पुन्हा मोठ्या प्रमाणावर खचल्याने तापोळा भागाशी संपर्क तुटला. या घटनेची पाहणी नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी केली. या ठिकाणी तातडीने पर्यायी मार्ग तयार करून वाहतूक सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे देवसरे गावातील शेतकरी भिवाजी जाधव यांच्या घराची भिंत कोसळली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संगीत, नृत्य, नाट्यातून वारीचा अनुभव; सातारकर कलावंतांच्या ‘ध्यास पंढरी’च्या पहिल्याच प्रयोगाला रसिकांचा उदंड प्रतिसाद
पुढील बातमी
E20 पेट्रोलवर लोकल सर्कल्स संस्थेचा धक्कादायक सर्व्हे; मायलेज घटलं, दुरुस्तीचा खर्चही वाढला, 65 टक्क्यांपेक्षा जास्त लोक विरोधात

संबंधित बातम्या