आमचे लक्ष आहे, तपास वेगाने करा; अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या घोटाळाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

by Team Satara Today | published on : 27 July 2026


नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या देणग्यांमध्ये कथित गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. निष्पक्ष आणि कोणत्याही दबावापासून मुक्त तपास आवश्यक असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला विशेष तपास पथक (एसआयटी) सोबत स्वतंत्र फॉरेन्सिक ऑडिटर तसेच चार्टड अकाऊंटंट नियुक्त करण्यास सांगितले आहे. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, सध्या न्यायालयाचा मुख्य भर हा तपासाच्या गुणवत्तेवर, पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की, "आमचे संपूर्ण लक्ष तपासावर आहे. हा तपास जलद, गुणवत्तापूर्ण, स्पष्ट, निष्पक्ष आणि विश्वासार्ह असला पाहिजे."

सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने सोमवारी या प्रकरणाची सुनावणी केली. या खंडपीठात न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचाही समावेश आहे. न्यायालयाने एसआयटीला ट्रस्टच्या आर्थिक नोंदी तपासण्याचे निर्देश दिले असून, या तपासाचा अहवाल न्यायालयात सादर करण्यास सांगितले आहे.

आर्थिक व्यवहारांची फॉरेन्सिक तपासणी

सर्वोच्च न्यायालयाने या तपासात आर्थिक तज्ज्ञांचा समावेश करण्याची गरज व्यक्त केली. न्यायालयाने एका अनुभवी आणि स्वतंत्र चार्टर्ड अकाऊंटंटचा एसआयटीमध्ये समावेश करण्याची सूचना केली. तुषार मेहता यांनी न्यायालयाच्या या सूचनेला सहमती दर्शवत, यासाठी कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले. फॉरेन्सिक ऑडिटर आणि चार्टर्ड अकाऊंटंटच्या सहभागामुळे देणग्यांचा प्रवाह, पावत्या, आर्थिक नोंदी आणि निधीच्या वापराची सखोल तपासणी होण्यास मदत होणार आहे.

सुधारात्मक उपाययोजनांवर भर

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, एसआयटीचा अहवाल आल्यानंतर आवश्यक त्या सुधारात्मक उपाययोजनांचा विचार केला जाईल. "एसआयटीला अहवाल सादर करू द्या. हे प्रकरण आम्ही बंद करत नाही. पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावले उचलावी लागतील," असे न्यायालयाने नमूद केले. याचिकाकर्त्यांनी एसआयटी तपासावर देखरेख ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारच्या वतीने सांगण्यात आले की, सध्या सर्वोच्च न्यायालयाचे तीन सदस्यीय खंडपीठ या प्रकरणावर लक्ष ठेवत आहे.

पारदर्शकतेकडे महत्त्वाचे पाऊल

राम मंदिराशी संबंधित देणगी प्रकरण धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील मानले जात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक व्यवहारांच्या तपासात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विश्वासार्हता राखण्यावर विशेष भर दिला आहे. आता एसआयटीचा अहवाल आणि फॉरेन्सिक ऑडिटच्या निष्कर्षांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
E20चा वाद आणखी पेटणार! आम आदमी पार्टी करणार सरकारविरोधात आंदोलन, नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
पुढील बातमी
औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीची तक्रारच बनावट; पुन्हा परीक्षा होणार नसल्‍याने रचला बनाव! 'ती' तक्रार बनावट असल्याची तक्रारदारांचा मेल

संबंधित बातम्या