दोन महिन्यांपासून बंद असलेली तापोळा येथील तराफा सेवा पुन्हा सुरू झाली; कोयना व कांदाटी खोऱ्यातील नागरिकांचे दळणवळण सुलभ होणार

by Team Satara Today | published on : 27 July 2026


बामणोली : कोयनेच्या शिवसागर जलाशयातील पाण्याने तळ गाठल्यानंतर मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली तापोळा येथील तराफा सेवा आज, सोमवार (दि.२७) पासून पुन्हा सुरू झाली आहे. यामुळे कोयना व कांदाटी खोऱ्यातील नागरिकांचे दळणवळण सुलभ होणार आहे. 

१०५ गावातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य अजित सपकाळ, महाबळेश्वर पंचायत समितीचे उपसभापती संजयराव मोरे यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. त्यामुळे दरवर्षी १५ ऑगस्टला सुरू होणारी तराफा सेवा यंदा लवकर सुरू झाली आहे.

कोयनेच्या शिवसागर जलाशयातून वाहनांची वाहतूक करण्यासाठी तापोळा याठिकाणी जिल्हा परिषदेमार्फत तराफा सेवा सुरू आहे. हा तराफा केळघर तर्फ सोळशी, तापोळा व गाढवली दरम्यान छोट्या मोठ्या वाहनांची जलाशयातून वाहतूक करत असतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा ही दरेगावी याच मार्गे जात असतो. कांदाटी, तापोळा, दरे भागातील दळणवळण व्यवस्थेचा कणा असलेली तराफा सेवा सुरू झाल्याने स्थानिकांसह पर्यटकांना सोयीचे होणार आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजित सपकाळ, महाबळेश्वर पंचायत समितीचे उपसभापती संजयराव मोरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल सपकाळ, आनंद धनावडे, सचिन कदम, प्रमोद कदम, गणेश भोसले, संतोष पवार, गणेश उतेकर,मंगेश माने आदी उपस्थित होते. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुसळधार पावसामुळे केळघर घाटात दरड कोसळली, सातारा-महाबळेश्वर रस्ता वाहतुकीसाठी बंद
पुढील बातमी
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर काहीसा मंदावला; कोयना धरणात ७१ टीएमसी पाणीसाठा

संबंधित बातम्या