माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही तर सुरुवात - सोनम वांगचुक यांचे परीक्षा विधेयकावर मोठं विधान

by Team Satara Today | published on : 27 July 2026


दिल्ली :  माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि संसदेत मांडण्यात आलेल्या सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर सोनम वांगचुक यांनी प्रतिक्रिया दिली. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही केवळ एका मोठ्या बदलाची सुरुवात आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सोमवारी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच सोनम वांगचुक यांनी थेट दिल्लीतील राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो होत्या.

सकारात्मक चर्चेतून चांगला मार्ग निघेल- सोनम वांगचुक

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर बोलताना सोनम वांगचुक म्हणाले की, "हा राजीनामा म्हणजे केवळ सुरुवात आहे. जर या मुद्द्याचे गांभीर्य ओळखून इथून पुढे योग्य पावले उचलली गेली, तर आपला देश आणखी उत्तम बनेल. माझ्या मते, ही प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. सध्या सकारात्मक चर्चा सुरू असून, देशासाठी सर्वात योग्य आणि उत्कृष्ट व्यवस्था लागू केली जाईल, अशी मला आशा आहे."

परीक्षा सुधारणा विधेयकाचे स्वागत

संसदेत मांडण्यात आलेल्या सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत बोलताना वांगचुक म्हणाले, "ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे. या विषयावर संसदेत सखोल चर्चा व्हावी आणि त्यानंतरच योग्य त्या उपाययोजना स्वीकारल्या जाव्यात."

"शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार"

विद्यार्थी आंदोलनावरील पोलीस कारवाईबाबत त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. "शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाऊ नये. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हा आपला घटनात्मक अधिकार आहे आणि त्याचा पूर्ण आदर केला गेला पाहिजे. मात्र, जर काही चुकीच्या हेतूने काही लोक एकत्र आले असतील, तर त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल, असंही वांगचूक म्हणाले.

 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दिलेलं आश्वासन पाळा, नाहीतर देशव्यापी आंदोलन करु; कॉकरोच जनता पार्टीचा सरकारला अल्टीमेटम
पुढील बातमी
मुसळधार पावसामुळे केळघर घाटात दरड कोसळली, सातारा-महाबळेश्वर रस्ता वाहतुकीसाठी बंद

संबंधित बातम्या