रिमझिम पावसात बेंदराचा उत्साह; जिल्ह्यात बैलांच्या मिरवणुकांनी वेधले लक्ष

by Team Satara Today | published on : 27 July 2026


सातारा : जिल्ह्यात सोमवारी पारंपरिक बेंदूर (पोळा) सण मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. दिवसभर सुरू असलेल्या रिमझिम पावसाची पर्वा न करता शेतकर्‍यांनी आपल्या लाडक्या बैलांची आकर्षक सजावट करून गावागावांतून पारंपरिक मिरवणुका काढल्या. ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथके, पारंपरिक वाद्ये आणि बळीराजा की जयच्या घोषणांनी ग्रामीण भाग दुमदुमून गेला.

या निमित्ताने बैलांना अंघोळ घालून त्यांना रंगीबेरंगी झुली, फुलांचे हार, घंटा, शिंगांना आकर्षक रंग व अलंकारांनी सजविण्यात आले. बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळी, गूळ, हरभरा आणि इतर पारंपरिक नैवेद्य अर्पण करण्यात आला. शेतीच्या कामात वर्षभर साथ देणार्‍या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यात आला.

सातारा, कराड, पाटण, वाई, खंडाळा, फलटण, कोरेगाव, जावळी आणि माण तालुक्यातील अनेक गावांमध्ये बैलांच्या मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले. अनेक ठिकाणी उत्कृष्ट सजविलेल्या बैलांना पारितोषिके देण्यात आली.

यंदा पावसाचे वातावरण असल्याने हिरवाईने नटलेल्या शिवारातून निघालेल्या बैलांच्या मिरवणुकांनी ग्रामीण संस्कृतीचे मनोहारी दर्शन घडविले. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या सणात उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने गावागावांत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला रिपाइंचा विरोध; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण व क्रीमीलेयरचा निकष लागू करणे घटनाविरोधी
पुढील बातमी
सातारा शहरात चेनस्नॅचिंगच्या घटना पुन्हा डोके वर काढू लागल्या; केसरकर पेठेत भरदिवसा चेनस्नॅचिंग

संबंधित बातम्या