सातारा : चार जणांना लाथाबुक्क्यांनी, लोखंडी सळईने व हॉकी स्टिकने मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गोविंद पोपट माने (रा. देगाव, ता. सातारा) हे त्यांच्या मित्रांसोबत घरासमोरील पायऱ्यांवर गप्पा मारत बसलेले असताना तेथीलच अजिंक्य रमेश फणसे हा दुकानाच्या शटर समोर लघवी करण्यासाठी उभा राहिला. त्याला इथे लघवी करू नको, असे म्हटल्यावरून फणसे याने तेथीलच जीवन पिसाळ, अक्षय आटपाळे, साईराज घाडगे आणि तन्मय घाडगे यांना बोलावून घेऊन माने यांच्यासह त्यांच्या तीन मित्रांना लाथा बुक्क्यांनी, लोखंडी सळईने व हॉकी स्टिकने मारहाण केली. तसेच फणसे याने माने यांच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढून घेतली असल्याचे गोविंद माने यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार माने करीत आहेत.