प्रशासनाने अत्यंत संवेदनशीलतेने नागरिकांचे प्रश्न तात्काळ निकाली काढावेत - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, छ. शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात

by Team Satara Today | published on : 26 July 2026


सातारा : एका छताखाली सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळावा व शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारून लागू नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व  समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले आहेत तरी नागरिकांनी या स्टॉलला भेट देऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून २६२-सातारा विधानसभा मतदारसंघांतर्गत वर्ये येथील विठ्ठल मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे  आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन विधान परिषदेच्या माजी उपसभापती आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.  प्रिया शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, सातारा पंचायत समितीचे सभापती महेश गाडे, मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष रूपाली वारागडे, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समीर यादव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या,छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'रयतेचे राज्य' या संकल्पनेनुसार शासन थेट जनतेच्या दारात पोहोचत आहे. सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कामांसाठी कार्यालयांचे फेरे मारावे लागू नयेत, हा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराची मुख्य भावना आहे. सातारा मतदारसंघातील प्रत्येक घटकाला आणि ग्रामीण भागातील शेवटच्या नागरिकाला या शिबिराचा थेट लाभ मिळावा, यासाठी सर्व प्रशासकीय विभागांनी समन्वयाने आणि तत्परतेने काम करावे, असे आवाहनही श्रीमती डॉ. गोऱ्हे यांनी केले.

शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हा शिबिराचा उद्देश आहे.  महिला, शेतकरी आणि युवकांसाठीच्या विविध योजनांचे दाखले एकाच ठिकाणी मिळणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. महसूल विभागाच्या या पुढाकारामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असून प्रशासनाने अत्यंत संवेदनशीलतेने नागरिकांचे प्रश्न तात्काळ निकाली काढावेत असेही श्रीमती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. 

जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती शिंदे म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिलांना विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्य शासनाने एकल महिलांवर लक्ष केंद्रित केले आहे या महिलांना प्रत्येक बचत गटामध्ये समाविष्ट करून त्यांचे आर्थिक स्त्रोत बळकट करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, महसूल विभाग प्रशासनाचा कणा आहे.  महसूल विभागाने आयोजित केलेल्या शिबिरामध्ये 22 हजार नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. आज या समाधान शिबिरामध्ये विविध स्टॉल उभारण्यात आले आहेत. या स्टॉलमध्ये अधिकारी कर्मचारी उपस्थित असून त्यांच्याकडून योजनांची माहिती घ्यावी त्या योजनेत आपण पात्र असाल तर जागेवरच अर्ज भरून द्यावा असेही जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी सांगितले.

याछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये महसूल, कृषी, सामाजिक न्याय, आरोग्य व इतर विविध सरकारी विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात आले होते. विविध शासकीय दाखले, प्रमाणपत्रे आणि दाखल्यांचे जागेवरच वाटप करण्यात आले. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, शिधापत्रिका, जातीचे उत्पन्नाचे तसेच विविध योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले. सातारा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांनी या शिबिरास उपस्थित राहून विविध शासकीय सुविधांचा प्रत्यक्ष लाभ घेतला. या कार्यक्रमात विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्याचे कलावंत सुरज दयाळ नृत्यजीत पुरस्काराने सन्मानित; एयर चीफ मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
पुढील बातमी
खोडशी धरणाचे काम 2027 पर्यंत पूर्ण करणार- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खोडशी धरणाची व कालव्याची पाहणी

संबंधित बातम्या