मी मुंबईत आहे आणि महाराष्ट्रातच राहणार आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण, दिल्लीत जाण्याबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम

by Team Satara Today | published on : 26 July 2026


मुंबई : केंद्र सरकारमध्ये अनेक घडामोडी घडत असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दिल्लीला पाचारण केलं जाईल आणि त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली जाईल, अशी चर्चा सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्टीकरण दिलं आहे. मी मुंबईत आहे आणि महाराष्ट्रातच राहणार आहे,असे फडणवीस यांनी सांगितले.

धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या शिक्षणमंत्रिपदावर कुणाची नियुक्ती होणार, याची चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात रंगली होती. याचदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अचानक दिल्लीला गेल्याने त्यांच्या  नावाबाबतही चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर आज प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, मी आज नागपुरात आहे. संध्याकाळी मुंबईत जाणार आहे. मी मुंबईतच आहे आणि महाराष्ट्रातच राहणार आहे, असे सांगून देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाण्याबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

कशी सुरू झाली होती दिल्लीत जाण्याची चर्चा

शनिवारी दुपारी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला होता. हे वृत्त समोर आले असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याचे कारण कळू शकलेले नव्हते. मात्र त्यावरून त्यांच्या दिल्लीत जाण्याबाबत  तर्कवितर्कांना सुरुवात झाली होती.

पंढरपूरमध्ये माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत काम करण्याच्या प्रश्नावर भाष्य केले होते. नरेंद्र मोदी सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून काम करत आहेत. तुम्ही देखील जास्त काळ काम करणारे मुख्यमंत्री ठरले आहात, तर पांडुरंगाचा आशीर्वाद आहे का? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "निश्चित पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. पण, मी सर्वाधिक काळ राहिलेलो नाही. तिसरा माझा क्रमांक आहे. पांडुरंगाची इच्छा असेल, तोपर्यंत काम करायचे आहे. मला असे वाटते की, किती काळ आपण राहिलो आहे, हे महत्त्वाचे नाही. आपण नेमका त्या काळाचा उपयोग काय केला, हे महत्त्वाचं आहे. मला विश्वास आहे की, पांडुरंगाच्या कृपेने अनेक चांगली कामे माझ्या हातून होतील", असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.  


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाटण तालुक्यातील बोंद्री गावाजवळ वाहिनीचा खांब पडल्याने २० गावांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
पुढील बातमी
साताऱ्याचे कलावंत सुरज दयाळ नृत्यजीत पुरस्काराने सन्मानित; एयर चीफ मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

संबंधित बातम्या