महाबळेश्वरच्या पावसानेही यंदा तीन हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला; कोयना धरणात ७१ टीएमसी पाणीसाठा

by Team Satara Today | published on : 26 July 2026


सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर काहीसा मंदावला असून, सातारा शहरातही उघडझाप सुरू आहे. तरीही, २४ तासांत सर्वाधिक पर्जन्यमान जोर येथे १०९ मिलिमीटर झाले. तर, महाबळेश्वरच्या पावसानेही यंदा तीन हजार मिलिमीटरचा टप्पाही पार केला. कोयना धरणातही तीन टीएमसीने वाढ झाली. त्यामुळे शुक्रवारी सकाळी धरणसाठा ७१ टीएमसी झाला होता. धरण भरण्यासाठी अजूनही ३४ टीएमसी पाण्याची गरज आहे.

सातारा जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पाऊस सुरू होता. बुधवार आणि गुरुवारी पश्चिम भागातील पाटण, महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. तसेच, कोयनासह धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रातही संततधार होती. यामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. पावसाचा जोर कायम राहिल्यास हे मोठे पाणी प्रकल्प लवकरच भरण्याची शक्यता आहे. पण, कोयना धरण भरण्यासाठी अजूनही ३४ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. तरीही, सध्याचा पाणीसाठा समाधानकारक स्थितीत आहे.

शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत वाई तालुक्यातील जोर येथे अधिक पाऊस झाला. १०९ मिलिमीटर पाऊस पडला आहे, तर १ जूनपासून आतापर्यंत ३ हजार ४४९ मिलिमीटरची नोंद झालेली आहे. तसेच, २४ तासांत कोयनानगर येथे ८८, नवजाला ६६ आणि महाबळेश्वरमध्ये ७८ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर, सकाळी कोयना धरणात ३५ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणात तीन टीएमसीहून अधिक साठा वाढला. सकाळी ७०.८८ टीएमसी साठा झाला होता. ६७.३४ टक्केवारी पाणीसाठ्याची आहे, तर आतापर्यंत कोयनेला २ हजार २८९, नवजा २ हजार ५९० आणि महाबळेश्वरला ३ हजार ३९ मिलिमीटर पाऊस पडलेला आहे.

सहा प्रकल्पांत १०५ टीएमसी पाणीसाठा

जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या मोठ्या प्रकल्पांची एकूण पाणीसाठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने सध्या धरणातील पाणीसाठा १०५ टीएमसीवर गेलेला आहे. ही धरणे ७० टक्क्यांवर भरलेली आहेत, तर २४ तासांत धोम धरणक्षेत्रात ८, बलकवडी ५५, कण्हेर ४०, उरमाेडी ४५ आणि तारळी धरणक्षेत्रात ३४ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आंदोलन संपले असले तरी, विद्यार्थ्यांवर करणाऱ्या पोलिसांविरोधात कायदेशीर लढाई सुरूच राहील - कॉकरोच जनता पार्टीची भूमिका
पुढील बातमी
महाबळेश्वर शहरातील जन्नी माता मंदिरातील चोरी केल्याप्रकरणी एकास नऊ महिने कारावासाची शिक्षा

संबंधित बातम्या