कराड : NEET/CBSE संदर्भातील विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा. नामदेवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली कराड येथे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आयोजित या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष कारवाईचा निषेध करत तसेच त्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दर्शवत आंदोलन करण्यात आले.
गेल्या ३६ दिवसांपासून नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करत होते. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष हल्ल्याचा निषेध म्हणून देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांच्या लढ्याला पाठिंबा दिला.
आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांनी हा निर्णय विद्यार्थी एकजुटीचा आणि लोकशाही मूल्यांचा विजय असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील म्हणाले, "विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर कोणत्याही प्रकारची तडजोड होऊ शकत नाही. गेल्या ३६ दिवसांपासून विद्यार्थी संयमाने आणि लोकशाही मार्गाने न्यायाची मागणी करत होते. त्यांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून पाठिंबा दिला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा, लोकशाहीवरील विश्वासाचा आणि संघर्षाचा विजय आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण होईपर्यंत काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत ठामपणे उभा राहील. देशातील शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने आवश्यक निर्णय घ्यावेत."
या आंदोलनाद्वारे विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य कराव्यात, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला अविश्वास दूर करावा, अशी मागणी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली.