सातारा : महिंद्रा कंपनीची थार चारचाकी वाहन खरेदी करण्याचे सांगून टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने वाहन घेऊन परत न करता फसवणूक करणार्या सोहेल अफजल बागवान (वय 28 रा पंढरपूर, जि. सोलापूर) या सराईत आरोपीला सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) पथकाने सोलापूर येथून अटक केली. आरोपीकडून सुमारे 32 लाख किमतीची दोन थार वाहने जप्त करण्यात आली असून सातारा शहर आणि चाकण पोलीस ठाण्यातील अशा दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 5 जुलै रोजी सातारा शहरातील महिंद्रा शोरूममध्ये आलेल्या एका व्यक्तीने थार वाहन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. टेस्ट ड्राईव्हसाठी वाहन घेऊन तो पसार झाला. वाहन परत न केल्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला तपासाचे आदेश दिले.
डीबी पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे आरोपीची ओळख निश्चित केली. त्यानंतर सोलापूर शहरातून सोहेल अफजल बागवानने चौकशीदरम्यान आरोपीने सातारा शहर तसेच पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच पद्धतीने थार वाहने फसवणुकीने नेल्याची कबुली दिली.
त्यानुसार एकूण 32 लाख किंमतीची दोन थार वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. या कारवाईनंतर सातारा शहर पोलिसांनी नागरिक व वाहन व्यावसायिकांना वाहन खरेदी-विक्री व्यवहार करताना संबंधित व्यक्तीची ओळख, कागदपत्रे आणि व्यवहाराची खातरजमा करण्याचे तसेच कोणताही संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे व गुन्हे प्रकटीकरण पथक तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी केली.