मुंबई : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरातील विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले होते. अखेर या आंदोलनाला यश मिळाले असून धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. "NEET पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतर-मंतरवर सलग २८ दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे. आंदोलकांच्या आग्रही मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक आहे. हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले, "विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीने देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिले, त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे मनःपूर्वक आभार. देशातील लोकशाहीने कात टाकली आहे आणि त्याचे श्रेय देशातील युवा पिढीला जाते, हे निश्चितपणे नमूद करावेसे वाटते."