फलटण : जन्मत:च आलेल्या दिव्यांगत्वामुळे चालण्यावर मर्यादा आली. शेतातील कामे करतानाही अडचणी येत होत्या; पण, विठ्ठलभक्तीने शारीरिक मर्यादांवर मात केली अन् चालण्याचे बळ मिळाले. फलटण तालुक्यातील हिंगणगावचे जयवंत विठ्ठल भोईटे (वय ६३) हे एका पायाने दिव्यांग असूनही गेली ३५ वर्षे अखंडित पायी आषाढी वारी करीत आहेत. विठ्ठलभेटीच्या तळमळीनेच दरवर्षी त्यांची वारी पूर्णत्वास जाते.
जयवंत भोईटे हे जन्मत:च एका पायाने दिव्यांग आहेत. लहानपणापासून त्यांना भजनांची आवड होती. यातून विठ्ठलाच्या भक्तीची गोडी लागली. गावातील माळकऱ्यांशी संगत जडली. यातूनच पायी वारी करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. दिव्यांग पायामुळे आपला संकल्प पूर्णत्वास जाईल का, याची साशंकता होती; पण, विठ्ठलावर भरवसा ठेवून ते वयाच्या २८व्या वर्षी आळंदी ते पंढरपूर पायी वारीत सहभागी झाले. चमत्कार झाल्यासारखे त्यांनी वारी पूर्ण केली आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला. आण्णा महाराज साजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कीर्तनाचे धडे घेतले. अध्यात्माच्या गोडीतून ते कीर्तनकार बनले. गेली ३५ वर्षे ते अखंडितपणे आषाढी वारी करतात.
सुरुवातीला आसपासच्या गावातील दिंडीत सहभागी व्हायचे. आपल्या गावातून वारी निघावी, या विचारातून त्यांनी हिंगणगावातील सामाजिक व प्रासादिक मंडळाच्या माध्यमातून श्री हरी प्रसाद दिंडीची स्थापना केली. यात गावातील आणखी काही ज्येष्ठांचा सहभाग होता. गेल्या १४ वर्षांपासून गावातील सुमारे दीडशे आबालवृद्ध आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतात. ते वारीत भजन-कीर्तनात रमतात. दिव्यांग असतानाही वारी पूर्ण करण्यासाठी विठ्ठलच बळ देतो. त्याची भक्ती आणि भेटीची तळमळच दर्शन घडवते, अशी भावना ते व्यक्त करतात.
दुसऱ्या पिढीचाही सहभाग
जयवंत महाराजांचा मुलगा केतन हादेखील गेल्या १० वर्षांपासून वारीत सहभागी होतो. तो वडिलांची वारीची परंपरा पुढे चालवत आहे. भजन-कीर्तनातही तो साथसंगत करतो. केतन यांचा मुलगा ज्ञानराज यालाही लहान वयातच वारीची ओढ लागल्याचे त्याचे आजोबा सांगतात.