दिल्ली येथील जंतर-मंतर लाठीमाराविरुध्द मुंबईच्या विविध भागांत मोर्चे; शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची तिरंगा रॅली

by Team Satara Today | published on : 25 July 2026


मुंबई: दिल्ली येथील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांसह नागरिक मुंबईच्या विविध भागांत रस्त्‍यावर उतरले. मुंबई शहरात शुक्रवारी पांजरापोळ,गोवंडीतील सायन-ट्रॉम्बे, देवनार टिळकनगर, सांताक्रूज आणि शिवाजी पार्क पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध ठिकाणी आंदोलने झाली.

दिल्लीतील जंतर-मंतर येथील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे गटाकडून शिवाजी पार्क येथे तिरंगा उंचावूया... राष्ट्रगीत गाऊया... या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.

"तुमच्याकडे बंदुका आणि लाठ्या असतील, पण आमच्याकडे तिरंगा आहे. भारताच्या राष्ट्रध्वजाला आव्हान देण्याची हिंमत आजपर्यंत कुणी केली नाही," असे ठाम विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका करताना यावेळी केले.

आंदोलनादरम्यान तिरंगा हातात घेऊन सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर करण्यात आलेल्या पोलीस कारवाईवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर दडपशाही करणे योग्य नसून, सरकारने विरोधकांचा आवाज दाबण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावे, असे ते म्हणाले.

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात जोपर्यंत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी दिला.

या कार्यक्रमाला तरुण-तरुणींची गर्दी जमली होती. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या… असे अनेक फलक त्यांच्या हातात होते. तिरंगा फडकावला जात होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो तरुणांच्या हातात होते.

सोनम वांगचुक यांनी आपल्यासाठी २५ दिवस उपोषण केले त्याबद्दल त्यांचे आभार; पण अजून आंदोलन संपलेले नाही. अभिजित दीपके यांच्यासह अनेक तरुण आंदोलन करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. जे या देशातील तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळतात, त्यांचे तुम्ही मित्र बनणार का? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारले.

तुम्ही सरकारविरोधात उभे राहण्याची हिंमत दाखवली आहे, त्याला मी सलाम करतो. हे आंदोलन आमचे नाही; पण तुमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मुंबईत तुम्ही मोकळ्या वातावरणात आंदोलन करा, तुमच्या केसालाही कोणी धक्का लावणार नाही, ही हमी मी देतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर लीक प्रकरणात मुख्य आरोपी वीरेंद्र गुप्ता बिहारमधून अटक; भिवंडी पोलिसांच्या या कारवाईमुळे तपासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा
पुढील बातमी
‘धर्मेंद्र प्रधानांचं खाते बदलू नका तर त्यांना मंत्रिमंडळातून वगळा’, राहुल गांधींची मागणी

संबंधित बातम्या