सातारा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शेंद्रे (ता. सातारा) येथे अवैध मद्यार्क (स्पिरीट) वाहतुकीवर धडक कारवाई करत 200 लिटर स्पिरीटसह सुमारे 9.12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी या प्रकरणी मेहुल संदीप पाटील (वय - 31, रा. इंदिरानगर, लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) व सुरज चंद्रकांत आटके (वय 32, रा. संभाजीनगर, धनकवडी, ता. हवेली, जि. पुणे) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे सातारा निरीक्षक यांनी शुक्रवारी (दि. 24) पुणे-आशियाई महामार्गावरील शेंद्रे (ता. जि. सातारा) येथे सापळा रचून ही कारवाई केली. कारवाईदरम्यान दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे 5 लिटर क्षमतेच्या 40 प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरलेले एकूण 200 लिटर मद्यार्क जप्त करण्यात आले. या मद्यार्काची किंमत 12 हजार रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार (क्रमांक - एमएच - 12 - व्हीटी - 1733) ही जप्त करण्यात आली. वाहनाची किंमत 9 लाख रुपये असून, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 9 लाख 12 हजार रुपये आहे.
आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त विजय चिऱाळकर यांच्या निर्देशानुसार अधीक्षक बाबासाहेब धुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक माधव चव्हाण व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक अजयकुमार पाटील करीत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात बनावट दारू, हातभट्टी दारू निर्मिती, विक्री किंवा अवैध वाहतूक होत असल्याची माहिती नागरिकांनी तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावी, असे आवाहन अधीक्षक बाबासाहेब धुतकर यांनी केले आहे.