सातारा : सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेवर खा. उदयनराजे भोसले गटाच्या स्वीकृत सदस्यांसह सुमारे २८ नगरसेवकांनी बहिष्कार टाकल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर प्रकरण, बांधकाम सभापती बाळू खंदारे यांच्यावरील निलंबनाची कारवाई आणि मागील सभेतील वादग्रस्त वक्तव्य इतिवृत्तातून न वगळल्याने नाराज झालेल्या उदयनराजे गटाने ही भूमिका घेतल्याने दोन्ही राजांच्या गटांतील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वसाधारण सभा झाली. सभेच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच उदयनराजे गट कामकाजावर बहिष्कार घालणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. ही बाब लक्षात घेऊन गटनेते अविनाश कदम यांनी खबरदारीचा उपाय म्हणून कामकाज चालवण्यासाठी व आवश्यक गणपूर्तीसाठी नगरसेवकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. १७ नगरसेवकांची उपस्थिती आवश्यक असताना ही संख्या पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली.
दीर्घ वेळ उलटूनही खासदार गटाचे नगरसेवक सभागृहात न आल्याने उपस्थित सदस्यांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाली. याच दरम्यान विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन सुरू करून प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा करत अवघ्या अर्ध्या तासात सभेचे कामकाज आटोपण्यात आले. या वेळी स्वीकृत नगरसेवकांसह उदयनराजे गटाचे २८ नगरसेवक गैरहजर राहिल्याचे स्पष्ट झाले.
खासदार गटाच्या या गैरहजेरीबाबत विचारणा केली असता, गटनेते अविनाश कदम यांनी सांगितले की उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर व प्रतोद निशांत पाटील यांच्याशी पूर्वचर्चा झाली होती आणि सर्वजण सभेला उपस्थित राहतील असे ठरले होते. मात्र, सभेच्या वेळी ॲड. बनकर यांचा फोन बंद होता आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज आल्याने इतर नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. दोन्ही छत्रपतींच्या नेतृत्वाखाली पालिकेचे कामकाज सुरळीत सुरू असून मनोमिलनाला कोणताही तडा गेलेला नाही, असा दावाही त्यांनी केला.
दुसऱ्या बाजूला, पालिकेतील दोन्ही गटांतील राजकीय तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सर्व नगरसेवकांची शासकीय विश्रामगृह येथे विशेष बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते नगरसेवकांना काय मार्गदर्शन करतात आणि गैरहजर राहिलेले उदयनराजे गटाचे नगरसेवक या बैठकीला उपस्थित राहणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.