फलटण : भरधाव कारवरील ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात सुरवडी येथील कमिन्स कंपनीतील तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीनजण गंभीर जखमी झाले. वाठार निंबाळकर हद्दीतील पुसेगाव–फलटण मार्गावर हा अपघात घडला. कार रस्त्यालगतच्या नाल्याच्या कठड्यावर जोरात आदळून पलटी झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मोहम्मद हुसेन (रा. अयोध्या, उत्तर प्रदेश), अनिल हेबरम आणि सदानंद पुर्ती (दोघे रा. जमशेदपूर, झारखंड) अशी अपघातात मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. तर नयन लोंगाणी, सौरभ कुमार (झारखंड) आणि एम. डी. मितारे (बिहार) हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी काम आटोपल्यानंतर फिर्यादी नयन लोंगाणी आणि त्यांचे सहकारी वाठार निंबाळकर येथील वसतिगृहात आले होते. रात्री सर्वजण कारने (क्र. एम एच १६ ए टी १७५६) फलटण-लोणंद पालखी महामार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले. जेवण झाल्यानंतर ताथवडे घाट परिसरात फेरफटका मारून परत येत असताना मोहम्मद हुसेन याने गाडी चालवण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्याच्याकडे वाहनाचा ताबा देण्यात आला.
वाठार निंबाळकर हद्दीत आल्यानंतर एका वळणावर भरधाव वेगामुळे मोहम्मद हुसेनचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन नाल्याच्या कठड्यावर आदळली अन् जागीच पलटी झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जखमींना फलटण येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच मोहम्मद हुसेन, अनिल हेबरम व सदानंद पुर्ती या तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
जखमींपैकी सौरभ कुमार यांना पुढील उपचारासाठी बारामती येथे हलवण्यात आले असून, एम. डी. मितारे यांच्यावर फलटण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात घडवल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.