सातार्‍यात युनायटेड यूथ फ्रंटचा मोर्चा; दिल्लीत विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईचा निषेध; पेपरफुटीची चौकशीची मागणी

by Team Satara Today | published on : 23 July 2026


सातारा : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सातार्‍यात गुरुवारी भर पावसात विद्यार्थी व युवक रस्त्यावर उतरले. युनायटेड यूथ फ्रंटच्या पुढाकारातून काढण्यात आलेल्या या मोर्चात सुमारे 150 हून अधिक युवक-युवती सहभागी झाले. आंदोलकांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.

पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर शाहू चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांना न्याय द्या आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकार थांबवा अशा आशयाचे फलक सहभागींच्या हातात झळकत होते.

शाहू चौकातील सभेत वक्त्यांनी दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भर पावसातही मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी झाल्याने आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.

नीट परीक्षेच्या कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेलाही सातार्‍यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागांत फिरून व्यापारी आणि व्यावसायिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, तर विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला. सातार्‍यात काही ठिकाणी व्यवहार सुरळीत सुरू राहिले, तर काही व्यापार्‍यांनी बंदला प्रतिसाद दिला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
करंजे पेठ येथील श्रीपतराव पाटील हायस्कूलमध्ये बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात; "ज्ञानोबा माऊली तुकाराम" जयघोषात पालखीची मिरवणूक
पुढील बातमी
कराडमध्ये काँग्रेसचे भर पावसात नीट पेपर घोटाळ्याविरोधात तीव्र आंदोलन; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

संबंधित बातम्या