मुंबई : देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांचा आणि विरोधकांचा संताप दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या आंदोलनाची झळ महाराष्ट्रातही पोहोचली असून, मुंबईत पार पडलेल्या एका आंदोलनादरम्यान मुंबई पोलिसांनी विद्यार्थ्यांना थेट ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचा व्हिडीओ काँग्रेसकडून ट्विट करण्यात आला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत त्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली. तसेच, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
कारवाई झालेला 'तो' पोलिस कोण?
विद्यार्थी आंदोलकांना खोट्या ड्रग्ज प्रकरणात गोवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई केली. या पोलिसाबद्दल अधिकची माहिती समोर आली आहे. त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव हवलदार पवन सांगळे (Constable Pawan Sangle) असे आहे. तो कर्मचारी शीव पोलीस ठाण्यात चालक म्हणून कार्यरत आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी व्हिडिओच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या पोलीस चालकाला त्याच्या सध्याच्या पदावरून हटवण्यात आले आहे. चौकशी अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
मुंबई काँग्रेसच्या अधिकृत 'एक्स' हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता, ज्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली. गेल्या काही दिवसांपासून, कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक शिवाजी पार्क, चेंबूर आणि आझाद मैदान यासह मुंबईच्या अनेक भागांमध्ये आंदोलन करत आहेत. त्यापैकी हा व्हिडीओ आहे. त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्री फडणवीसांनी महत्त्वाची माहिती दिली. "एक व्हिडीओ समोर आला आहे. त्याची चौकशी सुरु आहे. त्याची चौकशी सुरु असताना त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे आणि त्याला त्या पोलिस स्टेशनमधून काढण्यात आले आहे. याबाबतची चौकशी चाललेली आहे," असे ते म्हणाले.