मुंबई : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत विद्यार्थ्यांचे आंदोलन बुधवारीही सुरूच राहिले. चेंबूर, दादर परिसरात मोठ्या संख्येने ते जमले होते. चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. . त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केला. ‘पोलिसांनी लाठी हल्ला केला’, असा आरोप आंदोलनकर्ते रवी गायकवाड यांनी केला.
या आंदोलकांची उद्धवसेनेचे नेते आ. आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते आ. अमित ठाकरे यांनी भेट घेतली. तसेच चेंबूर पोलिस ठाण्यात जाऊन त्यांनी आंदोलकांना सोडण्याची मागणी केली. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, ‘तरुण स्वत:च्या भावना व्यक्त करण्यासाठी आंदोलन करत आहेत. ही शांततापूर्ण आंदोलने होत आहेत. पोलिसांनी ती होऊ द्यावीत.’
आयआयटी मुंबईच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यावेळी ३० ते ४० जणांना पवई पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. अर्ध्या तासाने त्यांची सुटका करण्यात आली. आंदोलन करणे हा आमचा अधिकार आहे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये विद्यार्थी मुद्दा गाजला
प्रश्नपत्रिकाफुटीचे प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाला मुंबई विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा पाठिंबा दर्शवावा तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना बडतर्फ करण्याची मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यामार्फत करावी, अशी मागणी युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी सिनेट सभेत केली. त्याबाबतचे निवेदन सिनेट सदस्यांनी कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना दिले.
युवासेना सिनेट सदस्य परम यादव यांनी लाठीचार्चाज निषेध करणारा ठराव मांडला. टी.वाय. बीकॉम पेपरफुटीप्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून, व्यवस्थापन परिषद बैठकीत मंजुरी घेऊन तपास करण्यात येईल, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितल्याची माहिती सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली.