ई-ऑफिसमध्ये सांगलीची राज्यात बाजी; ई-पावती निर्मितीत राज्यात प्रथम, डॉ. मैनाक घोष व निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांचे महत्त्वपूर्ण योगदान

by Team Satara Today | published on : 23 July 2026


सांगली : राज्यातील मंत्रालय सर्व्हर प्रणालीशी संलग्न असलेल्या शासकीय कार्यालयांच्या १ एप्रिल २०२६ ते २२ जुलै २०२६ या कालावधीतील ई-ऑफिस वापराच्या अहवालात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत डिजिटल प्रशासनात नवा मानाचा तुरा रोवला आहे. ई-ऑफिस प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीत जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष व निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले.

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने दि. १ एप्रिल ते २२ जुलै २०२६ या कालावधीत ३७ हजार २२२ ई-पावत्या स्वीकारून त्यांची नोंद केली. मंत्रालय स्तर वगळता राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ई-पावती निर्मितीत सांगलीने अव्वल स्थान मिळविले आहे. याशिवाय, ई-फाईल निर्मितीत १७ हजार ५६२ फाईल्स ई-ऑफिस प्रणालीवर तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे प्रशासनातील डिजिटल कार्यपद्धती अधिक सक्षम झाल्याचे अधोरेखित झाले आहे. जिल्ह्यातील ई-ऑफिस प्रणालीचा विस्तारही उल्लेखनीय आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसील, मंडळ अधिकारी (सर्कल) कार्यालये पूर्णपणे ई-ऑफिस प्रणालीशी जोडली गेली आहेत. तसेच जिल्ह्यातील जवळपास सर्व तलाठी कार्यालये या डिजिटल व्यवस्थेत समाविष्ट झाल्याने गाव पातळीपासून जिल्हास्तरापर्यंतची महसूल यंत्रणा एकाच डिजिटल साखळीत कार्यरत झाली आहे.

सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात ८९८ अधिकारी व कर्मचारी ई-ऑफिस प्रणालीचे नोंदणीकृत वापरकर्ते असून, कार्यालयीन पत्रव्यवहार, फाईल्सची हालचाल तसेच निर्गमित पत्रांचे वितरण डिस्पॅच सुविधेद्वारे डिजिटल पद्धतीने होत आहे. त्यामुळे कामकाजात पारदर्शकता, गती आणि कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे.

ई-ऑफिस प्रणाली नियमित वापरा : मैनाक घोष

ई-ऑफिसच्या नियमित आणि प्रभावी वापरामुळे नागरिकांच्या अर्ज व तक्रारींचा निपटारा अधिक वेगाने होत असून, प्रशासन अधिक लोकाभिमुख बनत आहे. जिल्ह्यातील सर्व स्तरांवरील कार्यालयांनी ई-ऑफिस प्रणालीचा अधिकाधिक व नियमित वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिला आंदोलकावर हात उचलणाऱ्या अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा यांना दणका; आंदोलनावरील कारवाईविरोधात दाखल याचिकांची दखल
पुढील बातमी
चांगला पाऊस पडू दे...शेतकरी सुखी होऊ दे; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाकडे साकडे; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रंगला सोपानकाका-माऊलींच्या बंधूभेट सोहळा

संबंधित बातम्या