यापुढे सरकारने विद्यार्थ्यांवर हल्ला केल्यास आम्ही सर्वजण तुमच्यासोबत लढू - मनोज जरांगे पाटील, भाजपवर जोरदार हल्लाबोल

by Team Satara Today | published on : 22 July 2026


नवी दिल्ली: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज नवी दिल्ली इथं जात अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी जरांगे पाटील यांनी अभिजीत दिपके यांचं कौतुक करत त्यांना आंदोलनासाठी कानमंत्र दिला आहे. तुम्ही ही जागा सोडू नका, अन्यथा सरकार तुमचं आंदोलन चिरडून टाकेल, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच यापुढे सरकारने विद्यार्थ्यांवर हल्ला केल्यास आम्ही सर्वजण तुमच्यासोबत लढू, असा विश्वासही जरांगे यांनी दिला आहे.

जंतर मंतर इथं सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या व्यासपीठावर आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "आम्ही अंतरवाली सराटी इथं गोरगरिबांच्या लेकरांसाठी आंदोलन केलं. तेव्हाही यांच्या सरकारने लहान मुलं, महिलांवर लाठीचार्ज केला. या सरकारने आमच्यावरही गोळ्या घातल्या होत्या. माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की, तुम्ही ही जागा सोडू नका. पूर्ण देश तुमच्या सोबत आहे. तुम्ही इकडं-तिकडं गेला तर हे लोक आंदोलन मोडून टाकतील. शांततेच्या आंदोलनात प्रचंड ताकद आहे आणि आम्ही ते सिद्ध करून दाखवलं आहे. आम्हीही तुमच्या सोबत आहोत," असा शब्द जरांगे पाटलांनी दिला.

भाजपवर जोरदार हल्लाबोल

अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असताना मनोज जरांगे पाटील यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. "देशातील भाजप सरकार वारंवार गोरगरिबांच्या लेकरांवर अन्याय करत आहे. यापुढील काळात जर पुन्हा सरकारने अशा प्रकारचा हल्ला विद्यार्थ्यांवर करण्याचा प्रयत्न केला तर या नेत्यांचं महाराष्ट्रात फिरणं पूर्ण बंद होणार. यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही," असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

"सरकारला आपण निवडून दिलं आहे. आपल्या मायबापाने यांना मतदान केलंय, आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यात आणि गावातील लोकांनी यांना मतदान केलं आहे. परंतु हेच लोक आपल्यावर आता उलटले आहेत. यांना उलटं करण्याची ताकद या देशातील विद्यार्थ्यांमध्ये आहेत, लोकांमध्ये आहे. पण ही गोष्ट यांच्या लक्षात येत नाही. यापुढील काळात तुम्हाला धक्का लागला तर आम्ही तुमच्या सगळ्यांसोबत आहोत, अभिजीत भैय्यांसोबत आहोत, एवढाच शब्द मी तुम्हाला देतो," असंही मनोज जरांगे म्हणाले.

दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांना हिंदीतून बोलण्याची विनंती केली होती. मात्र माझी हिंदी ऐकल्यावर तुम्हाला जी हिंदी येते, तीही तुम्ही विसरून जाल, अशी मिश्किल टिपण्णी त्यांनी केली. त्यानंतर अभिजीत दिपके यांनी जरांगे पाटील यांनी मराठीत केलेल्या भाषणाचा सार हिंदीतून सांगत जरांगे पाटील आपल्यासोबत असल्याचा विश्वास आंदोलकर्त्या तरुणांना दिला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महसूल विभागाच्या भरारी पथकाच्या वाहनावर जेसीबी चालवून हल्ला; फलटण तालुक्यातील तांबवे धरण परिसरातील घटना
पुढील बातमी
कास तलाव परिसरात सध्‍या मोठ्या प्रमाणात पाऊस; कास तलाव ओव्हरफ्लो, पाण्यात उतरणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात

संबंधित बातम्या