कराड : एका कारचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणाऱ्या दोन कार एकमेकांवर आदळल्या. या तिहेरी अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या येथील नवीन युनिक उड्डाणपुलावर मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हा पहिलाच अपघात झाला. अपघातानंतर सातारा कोल्हापूर लेनवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
कार (क्र. एमएच १० एसी ४५६०) कोल्हापूर दिशेला जात होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या येथील नवीन उड्डाणपुलावर आले असता कारचालकाने अचानक ब्रेक दाबला. याचवेळी पाठीमागून कोल्हापूर दिशेला निघालेल्या कारची (क्र. एमएच ४६ बीझेड ८९३८) या कारला धडक झाली.
याचवेळी पुन्हा कोल्हापूर दिशेला निघालेली तिसरी कारची (एमएच १५ डीसी ४७६३) दोन्ही कारला पाठीमागून धडक झाली. या तिहेरी अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर सातारा कोल्हापूर लेनवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.