पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात पोहोचणार एका तासात; जयगड बंदर-चिपळूण-सातारा द्रुतगती महामार्गाला गती

by Team Satara Today | published on : 22 July 2026


रत्नागिरी : तालुक्यातील जयगड बंदराशी पश्चिम महाराष्ट्र जाेडणाऱ्या द्रुतगती महामार्गाच्या कामाला गती मिळू लागली आहे. या ९८ किलोमीटरच्या प्रस्तावित द्रुतगती महामार्गामुळे सध्याचा सातारा ते जयगड हा सुमारे पाच तासांचा प्रवास केवळ एका तासात शक्य होणार आहे. जयगड बंदर - चिपळूण - सातारा असा हा मार्ग आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासह त्याची व्यवहार्यता तपासण्याचे पाऊल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उचलले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड हे महत्त्वाचे बंदर आहे. या बंदराची जोडणी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांशी केली जाणार आहे. यासाठी जयगड बंदर - चिपळूण - सातारा असा ९८ किलाेमीटरचा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तो मुंबई - बंगळुरू महामार्गाशी कराडजवळ जोडला जाईल. या महामार्गासाठी सुमारे ९ हजार ६०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

या महामार्गाच्या उभारणीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासह आर्थिक व्यवहार्यता तपासण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. यासाठी प्राधिकरणाने निविदा मागविल्या आहेत.

या प्रकल्पाचा आराखडा तयार करताना महामार्गाची रचना, सेवा रस्त्यांची रचना, सध्याच्या पुलांचे रुंदीकरण अथवा नवीन पुलांचे बांधकाम या प्रमुख बाबींवर भर देण्यात येईल. याचबरोबर महामार्गाचे आरेखन करताना भौगोलिक स्थितीचा प्रामुख्याने विचार केला जाणार आहे.

या प्रकल्पाच्या क्षेत्रात डोंगराळ भाग असल्याने बोगदाही तयार करण्याचे नियाेजन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन करुन त्यामुळे किती विस्थापितांचे पुनर्वसन करावे लागेल, याचा आढावा घेतला जाणार आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च, त्याची आर्थिक व वित्तीय व्यवहार्यता विश्लेषण, पर्यावरणीय व सामाजिक परिणाम याची माहितीही सल्लागार संस्थेकडून घेतली जाणार आहे.

रत्नागिरी तालुक्यातील जयगड हे खोल पाण्यातील बंदर असून, ते सर्व प्रकारच्या हवामानात बारमाही सुरू असते. या बंदरावरून प्रामुख्याने लोहखनिज, कोळसा, बॉक्साइट, चुनखडी यांची वाहतूक होते. त्याचबरोबर ते देशातील पहिले द्रविभूत नैसर्गिक वायू (एलएनजी) आणि द्रविभूत पेट्रोलियम वायू (एलपीजी) साठवणूक केंद्र आहे.

...असे आहे नियाेजन

    एकूण लांबी ९८ किलोमीटर

    आठ पदरी महामार्गासाठी भूसंपादनाची योजना

    सुरुवातीच्या टप्प्यात चारपदरी महामार्ग

    नागरी क्षेत्रात १० मीटरचे सेवा रस्ते

    राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ठिकाणांशी जोडणी


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांची झालेली धरपकडीचे देशभरात जोरदार पडसाद; पाटणा, हैदराबादसह अनेक ठिकाणी काँग्रेस-भाजपा कार्यकर्ते आमने-सामने, तुफान राडा
पुढील बातमी
मलकापुरातील युनिक उड्डाणपुलावर अपघात, कारचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने दोन कार एकमेकांवर आदळल्या

संबंधित बातम्या