राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांची झालेली धरपकडीचे देशभरात जोरदार पडसाद; पाटणा, हैदराबादसह अनेक ठिकाणी काँग्रेस-भाजपा कार्यकर्ते आमने-सामने, तुफान राडा

by Team Satara Today | published on : 22 July 2026


दिल्ली : नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि देशातील एकूणच शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाने आता देशव्यापी रूप घेतलं आहे. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरूनही कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांसह देशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. 

दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मंगळवारी काँग्रेसने पंतप्रधानांच्या निवास्थानासमोर केलेलं आंदोलन आणि या आंदोलनादरम्यान, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांची झालेली धरपकड याचे जोरदार पडसाद आज देशभरात उमटले. तसेच देशातील अनेक राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आले त्यामुळे अनेक ठिकाणी वातावरण तंग झाले.

बिहारमध्ये राजधानी पाटणा येथे काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या मोर्चामुळे काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने सामने आले. यादरम्यान, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाठ्या-काठ्या, दगडगोट्यांनी मारहाण केली. यात काही कार्यकर्ते जखमी झाले. आता यावरून काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले.

पाटण्याप्रमाणेच तेलंगाणाची राजधानी असलेल्या हैदराबादमध्येही काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने सामने आले. हैदराबादमधील भाजपाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी आमदार व्यंकट बालमूर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे  कार्यकर्ते आले असताना भाजपाच्या आमदारांनी त्यांना विरोध केला. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. तसेच एकमेकांवर दगडफेक केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
"राम मंदिराची चोरी बोचत नसेल, तर कशाचीच लाज उरली नाही" - अलाहाबाद हायकोर्टाचा भ्रष्टाचाऱ्यांवर घणाघात
पुढील बातमी
पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात पोहोचणार एका तासात; जयगड बंदर-चिपळूण-सातारा द्रुतगती महामार्गाला गती

संबंधित बातम्या