दिल्ली : NEET परीक्षा पेपरफुटीप्रकरणी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला हल्लाबोल केला. देशातील शिक्षणव्यवस्था सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली असल्याचा आरोप करत, या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
आकडेवारी मांडत राहुल गांधी म्हणाले, "NEET परीक्षेसाठी दरवर्षी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांचा एकूण खर्च १.३२ लाख कोटी रुपये होतो. दुसरीकडे, संपूर्ण देशाच्या शिक्षणासाठी केंद्र सरकारचे बजेट १.४ लाख कोटी रुपये आहे. म्हणजेच, देशातील सामान्य कुटुंबे सरकार एवढाच खर्च स्वतःच्या खिशातून करत आहेत. तरीही सरकार अशा महत्त्वपूर्ण परीक्षेकडे दुर्लक्ष करत आहे."
१० वर्षांत १५२ पेपरफुटी, पण एकालाही शिक्षा नाही
"गेल्या १० वर्षांत देशात तब्बल १५२ पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत, परंतु एकाही दोषीला कडक शिक्षा झालेली नाही. हा एवढा मोठा अपराध घडत असताना कोणीच जबाबदार कसे नाही?" असा संतप्त सवाल त्यांनी केला. पेपरफुटीमुळे सामान्य कुटुंबातील हजारो विद्यार्थी नैराश्यात गेले असून काहींनी आपले जीवन संपवले आहे, शांततेच्या मार्गाने न्याय मागणाऱ्या तरुणांवर लाठीचार्ज का करण्यात आला?" असा थेट सवाल करत राहुल गांधी यांनी देशातील शिक्षणव्यवस्था आता सर्वसामान्यांसाठी परवडणारी राहिली नसल्याची टीका केली.
राहुल गांधी यांनी तीन प्रमुख मागण्या मांडल्या
NEET पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
आंदोलक तरुणांवर आणि विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज व हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.
साडेसात कोटी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना झालेल्या मनस्तापाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः देशवासीयांची आणि विद्यार्थ्यांची माफी मागावी.