कल्याणी शाळेत विद्यार्थी, शिक्षक आणि स्कूल बस चालकांना वाहतूक शिस्त, सायबर सुरक्षेचे धडे; पोलीस विभागाकडून जनजागृती अभियान

by Team Satara Today | published on : 21 July 2026


सातारा : रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती वाढविण्यासह सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी सातारा शहर वाहतूक शाखेच्या वतीने मंगळवारी कल्याणी शाळेत विशेष जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सुमारे 250 विद्यार्थी, शिक्षक तसेच स्कूल बस चालकांनी सहभाग घेतला.

कार्यशाळेत सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी वाहतूक नियमांचे पालन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना सुरक्षित रस्ते वापराचे धडे दिले. झेब्रा क्रॉसिंगचा वापर, वाहतूक सिग्नलचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, तसेच अल्पवयीनांनी वाहन चालविणे टाळावे, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे सायबर फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्याचे नमूद करत त्यांनी बनावट लिंक, ओटीपी, बँक खात्याची गोपनीय माहिती आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर याबाबत विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. कोणत्याही संशयास्पद संदेशाला प्रतिसाद देण्यापूर्वी खात्री करून घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी नव्या फौजदारी कायद्यांतील महत्त्वाच्या तरतुदींची माहिती देत कायद्याचे पालन आणि नागरिकांची जबाबदारी यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आपत्कालीन प्रसंगी ‘डायल 112’ या एकात्मिक आपत्कालीन सेवा क्रमांकाचा प्रभावी वापर कसा करावा, याचीही माहिती उपस्थितांना देण्यात आली.

स्कूल बस चालकांसाठी आयोजित स्वतंत्र सत्रात विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या नियमांचे पालन, वाहनांची नियमित तपासणी, वेगमर्यादा, प्रथमोपचार पेटी, अग्निशामक यंत्र, जीपीएस, सीसीटीव्ही आणि आवश्यक कागदपत्रे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेच्या समारोपावेळी विद्यार्थ्यांनी वाहतूक, सायबर सुरक्षा आणि आपत्कालीन सेवांबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. पोलीस अधिकार्‍यांनी त्यांची समाधानकारक उत्तरे देत सुरक्षित व जबाबदार नागरिक बनण्याचा संदेश दिला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी महिला काँग्रेसचा साताऱ्यात मोर्चा; जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन
पुढील बातमी
माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी; अंगापूरच्या वैभव गवळी यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

संबंधित बातम्या