महाबळेश्वर : पश्चिम घाटातील जैवविविधतेसाठी महत्त्वाची ठरणारी दुहेरी संशोधनात्मक उपलब्धी महाबळेश्वर तालुक्यातील वाडा-कुंभरोशी परिसरात नोंदविण्यात आली आहे. ‘ओबेरोनिया चंद्रशेखराणी’ या दुर्मीळ स्थानिक ऑर्किडची महाराष्ट्रातून प्रथमच नोंद झाली असून, ‘पिनालिया म्हैसूरएन्सिस’ अर्थात ‘म्हैसूर इरिया’ या ऑर्किड प्रजातीचा तब्बल १२५ वर्षांनंतर महाराष्ट्रात पुनर्शोध लागला आहे. या दोन्ही संशोधनांमुळे महाबळेश्वर परिसराची जैवविविधतेतील ओळख अधिक ठळक झाली आहे.
या संशोधनात डॉ. जीवन सिंह जलाल, सागर कुलकर्णी, यशस्विनी राऊत, आकाश राऊत, मयुरेश कुळकर्णी आणि शर्विल बीडकर यांचा सहभाग आहे. ‘ओबेरोनिया चंद्रशेखराणी’ संदर्भातील संशोधन बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या नेल्युम्बो या संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झाले असून, ‘पिनालिया म्हैसूरएन्सिस’संदर्भातील संशोधन ४ जुलैला इंटरनॅशनल जनरल ऑफ बॉटनी स्टडीजमध्ये प्रकाशित झाले आहे.
‘पिनालिया म्हैसूरएन्सिस’ ही सध्या लिस्ट कन्सर्न (एलसी) श्रेणीत असली, तरी नागरीकरण, जंगलांचे विखंडीकरण आणि विकासकामांमुळे तिच्या अधिवासाचे संवर्धन आवश्यक असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे. महाबळेश्वर परिसरातील या दोन महत्त्वपूर्ण संशोधनांमुळे पश्चिम घाटातील दुर्मीळ वनस्पती संपदेच्या संवर्धनाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
शेवटची नोंद १९०० मध्ये
महाबळेश्वर परिसरातील वनभ्रमंती दरम्यान संशोधकांना एका आंब्याच्या झाडावर वाढणारी ऑर्किडची वनस्पती आढळली. पुढील निरीक्षणात तिला फुले आल्यानंतर नमुने गोळा करून शास्त्रीय पडताळणी करण्यात आली. त्यानंतर ती पिनालिया म्हैसूरएन्सिस असल्याचे निश्चित झाले. या प्रजातीची महाबळेश्वरमधील शेवटची नोंद १९०० मध्ये झाली होती. त्यानंतर महाराष्ट्रात ती पुन्हा कधीच आढळली नव्हती. त्यामुळे राज्यातून नामशेष झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तब्बल १२५ वर्षांनंतर झालेला हा पुनर्शोध वनस्पतिशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.