नागपूर : डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अँटिबायोटिक किंवा अँटिव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. त्यामुळे डेंग्यूवरील लसीची सर्वांनाच प्रतीक्षा होती. अखेर 'ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया'ने (डीसीजीआय) ४ ते ६० वयोगटातील व्यक्तींसाठी 'क्यूडेंगा' या डेंग्यू प्रतिबंधक लसीला परवानगी दिली आहे. भारतात मंजुरी मिळालेली ही पहिलीच डेंग्यू लस आहे.
'क्यूडेंगा' ही एक टेट्राव्हॅलेंट लस असून ती डेंग्यूच्या प्रामुख्याने चार प्रकारापासून संरक्षण प्रदान करते. या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे लसीकरणापूर्वी कोणत्याही चाचणीची गरज नाही आणि पूर्वी डेंग्यूचा संसर्ग झाला असो वा नसो, ती सर्वांसाठी सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे. ही लस ०.५ मिलीच्या दोन डोसमध्ये तीन महिन्यांच्या अंतराने दिली जाते.
२८ हजारांहून अधिक सहभागींवर चाचणी
२८,००० हून अधिक सहभागींवर या लसीची चाचणी करण्यात आली. ही लस डेंग्यूमुळे रुग्णालयात दाखल होण्यापासून दीर्घकाळ टिकणारे संरक्षण देत असल्याचे सांगितले जाते. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) देखील या लसीला मान्यता दिली आहे.
नागपुरात ७ महिन्यांत १८ रुग्ण
मनपाच्या आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, नागपूर शहरात जानेवारी ते २० जुलैपर्यंत डेंग्यूच्या १८ रुग्णांची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या फार कमी आहे.
"होयूवरील लस घेतल्यास रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र डासांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रत्येकाने प्रतिबंधक उपाययोजना करायलाच हव्यात. जसे आठवड्यातून एक दिवस कुलरचे पाणी फेकून द्यावे. त्यात डास होणार नाहीत याची काळजी घ्यावी, घरात आत व परिसरात कुठेही पाणी साचून राहणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा."
- डॉ. वसंत खळतकर, माजी राष्ट्रीय अध्यक्ष इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स