युक्रेनच्या किनाऱ्याजवळ एका व्यापारी जहाजावर रशियाचा हल्ला, ४ भारतीयांचा मृत्यू; घटनेबाबत भारताचा तीव्र आक्षेप

by Team Satara Today | published on : 21 July 2026


नवी दिल्ली : युक्रेनच्या किनाऱ्याजवळ एका व्यापारी जहाजावर रशियाने हल्ला केला. यात चार भारतीयांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर केंद्र सरकारने मंगळवारी भारतातीलरशियाच्या राजदूतांना बोलावून तीव्र निषेध नोंदवला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने या हल्ल्याला निंदनीय म्हटले असून, आपल्या नागरिकांच्या मृत्यूसाठी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने नवी दिल्लीतील रशियन प्रभारी राजदूत व्लादिमीर लदानोव्ह यांना बोलावून या घटनेबाबत भारताचा तीव्र आक्षेप नोंदवला आणि स्पष्टीकरण मागितले आहे.

भारतीयांच्या मृत्युसाठी रशिया जबाबदार

युक्रेनच्या किनाऱ्यावर व्यापारी जहाजावर क्रू मेंबर्स म्हणून काम करत असताना या चार भारतीयांचा मृत्यू झाला. दोन देशांमधील युद्ध सुरूच असताना युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्यासाठी रशियाला जबाबदार धरले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने रशियाला चिंता कळवली आहे आणि या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

१९ जुलै रोजी नक्की काय घडले?

माहितीनुसार, १९ जुलैच्या संध्याकाळी युक्रेनच्या ओडेसा बंदरातून बाहेर पडताना 'एमव्ही गोल्डन लिओ' या गिनी-बिसाऊचा ध्वज असलेल्या मालवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यात चार भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. धान्य वाहून नेणाऱ्या या जहाजावर पाच भारतीयांसह एकूण १७ क्रू मेंबर्स होते.

घटनेची भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने पुष्टी केली. त्यानंतर एका दिवसानंतर भारताने आपला निषेध रशियाकडे नोंदवला आहे.  परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे की, "मिळालेल्या माहितीनुसार, चार भारतीय नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर एकाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्यापारी जहाज आणि निष्पाप नागरी खलाशांना लक्ष्य करणे अजिबात स्वीकार्य नाही", असे भारताने म्हटले आहे.

"भारत अशा हल्ल्यांचा निषेध करतो आणि पुन्हा एकदा सांगतोय की व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करणे आणि निष्पाप नागरी क्रू मेंबर्सचा जीव धोक्यात घालणे, किंवा नौकानयन आणि व्यापाराच्या स्वातंत्र्यात अडथळा आणणे निंदनीय आहे आणि ते टाळले पाहिजे," असे मंत्रालयाने म्हटले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरूवात; कोयना साठा ६० टीएमसीच्या उंबरठ्यावर, कण्हेर, बलकवडी धरणातून पाण्याचा विसर्ग
पुढील बातमी
'आतंकवादी' शब्दावरून वक्तव्य अन् नंतर स्पष्टीकरण; आंदोलन करणाऱ्यांना दहशतवादी म्हटलं नाही - सदाभाऊ खोत

संबंधित बातम्या