सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम आणि घाट भागात पावसाचा जोर कायम असून, धरणक्षेत्रातही हजेरी आहे. यामुळे धरणातीलपाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. २४ तासात कोयना धरणात सुमारे अडीच टीएमसी वाढ झाल्याने सोमवारी सकाळच्या सुमारास ५८.८९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. जिल्ह्यातील कण्हेर आणि बलकवडी धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. तसेच २४ तासात पाथरपुंजला १८१ मिलिमीटर पर्जन्यमान झाले.
जिल्ह्यात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाली आहे. विशेषकरून पश्चिम भागातच पावसाचा जोर अधिक आहे. सातारा शहरात दोन दिवस चांगला पाऊस झाला. पण, रविवारपासून पावसाचे प्रमाण कमी आहे. सोमवारी सकाळीही पावसाची उघडीप होती. ढगाळ वातावरण तयार झालेले. पण, शहराच्या पश्चिम भागातील परळी खोरे, उरमोडी धरण, ठोसेघर परिसरात पाऊस पडत आहे. त्याचबरोबर कास, तापोळा, कोयना, नवजा, पाथरपुंज, जोर या भागात पाऊस सुरूच आहे. कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर आणि तारळी धरण पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस सुरू आहे. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. तसेच धरणसाठाही हळूहळू वाढू लागला आहे.
सोमवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासात नवजा येथे १०६ मिलिमीटरची नोंद झाली. महाबळेश्वर येथे ८२ आणि कोयनानगरला ९५ मिलिमीटर पाऊस झाला. कोयना धरणात २७ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणात २४ तासात २.३५ टीएमसी पाणीसाठा वाढला. सकाळी धरणात ५८.५९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धोम धरणातही ८.५४ टीएमसी पाणीसाठा झाला होता. बलकवडीत ३.३७, कण्हेरमध्ये ८.८४, तारळी ३.३६ आणि उरमोडी धरणात ६.३८ टीएमसी पाणीसाठा झालेला. हे सहा प्रमुख प्रकल्प ५६ ते ८८ टक्क्यांपर्यंत भरले आहेत. धरणात आवक सुरू असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करण्यात येत आहे. यामध्ये बलकवडी धरणातून १५०, कण्हेर ३४० आणि तारळी धरणातून १८५ क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे वेण्णा आणि तारळी नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे.
महाबळेश्वरचा पाऊस अडीच हजार मिलिमीटर पार -
जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पश्चिम भागात जोरदार हजेरी लावत आहे. १ जूनपासून आतापर्यंत महाबळेश्वर येथे २ हजार ६०६ मिलिमीटर पाऊस झाला आहे, तर नवजाला २ हजार २०९ आणि कोयनानगर येथे १ हजार ९२४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सर्वाधिक पर्जन्यमान पाटण तालुक्यातील पाथरपूंज येथे २ हजार ६६६ मिलिमीटर झाले. सोमवारी सकाळपासूनही पाथरपुंजला जोरदार पाऊस पडत होता.