विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर; महाविकास आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन; परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी

by Team Satara Today | published on : 20 July 2026


सातारा : स्पर्धा परीक्षा, नोकरभरती आणि ऑनलाइन परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने सोमवारी सातार्‍यात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करून शासनाचे लक्ष विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे वेधले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत केंद्र व राज्य सरकारकडे सादर करण्यात आले.

निवेदनात स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार समोर येणार्‍या कथित पेपरफुटीच्या घटनांची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. परीक्षा प्रक्रियेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका महाविकास आघाडीने मांडली.

तसेच ब्लॅकलिस्ट करण्यात आलेल्या कंपन्यांना परीक्षा प्रक्रियेची कंत्राटे देऊ नयेत, राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) कामकाजातील त्रुटींची जबाबदारी निश्चित करावी, ऑनलाइन परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित, पारदर्शक व विश्वासार्ह करण्यासाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा तातडीने राबवाव्यात, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या.

विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

याशिवाय, विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित वागणुकीचा निषेध व्यक्त करण्यात आला. विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी दिला.

या आंदोलनात महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थी प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुय्यम निबंधकावर झालेल्या हल्ल्याचे सातार्‍यात पडसाद; नोंदणी व्यवहार ठप्प, महसूल संकलनावरही परिणाम
पुढील बातमी
सायबर गुन्ह्यातील रक्कम खात्यात जमा; धुमाळवाडीतील युवकाविरुद्ध गुन्हा

संबंधित बातम्या