दुय्यम निबंधकावर झालेल्या हल्ल्याचे सातार्‍यात पडसाद; नोंदणी व्यवहार ठप्प, महसूल संकलनावरही परिणाम

by Team Satara Today | published on : 20 July 2026


सातारा : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात प्रभारी दुय्यम निबंधकावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर राज्यभरात दुय्यम निबंधक व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांनी बेमुदत कामबंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. त्याचे पडसाद सोमवारी सातार्‍यातही उमटले. शहरातील दोन्ही दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दिवसभर कोणताही नोंदणी व्यवहार झाला नाही. त्यामुळे दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली.

आंबेगाव तालुक्यातील दत्तनगर येथे प्रभारी दुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांनी नियमांनुसार दस्त नोंदणी नाकारल्याचा राग मनात धरून काही व्यक्तींनी कार्यालयातच त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली. या मारहाणीत ते जखमी झाले असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. या घटनेचा निषेध करत राज्यभरातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

या आंदोलनामुळे सातार्‍यातील दोन्ही दुय्यम निबंधक कार्यालयांतील दैनंदिन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. खरेदी-विक्री दस्त, गहाणखत, भेटपत्र, भाडेकरार तसेच इतर नोंदणीची सर्व कामे बंद राहिली. पूर्वनियोजित वेळेनुसार कार्यालयात आलेल्या नागरिकांना कामकाज सुरू नसल्याची माहिती देण्यात आली.

विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सातार्‍यातील दोन्ही कार्यालयांतून दररोज सरासरी सुमारे 20 लाख रुपयांचा महसूल शासनाकडे जमा होतो. मात्र आंदोलनामुळे हा महसूल तात्पुरता थांबला असून आंदोलनाची मुदत वाढल्यास शासनाच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई, नोंदणी कार्यालयांतील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस धोरण जाहीर करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका कर्मचारी संघटनांनी स्पष्ट केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मंगल कार्यालयातील विवाहसोहळ्यातील चोरी उघड; कोल्हापूरचा सराईत चोरटा जेरबंद, दागिने व रोख रक्कम फिर्यादीकडे सुपूर्द
पुढील बातमी
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर; महाविकास आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन; परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी

संबंधित बातम्या