सातारा : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह महाबळेश्वर परिसरात रविवारी पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावल्याने कोयना धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. धरण सध्या 60 टक्के भरतीच्या उंबरठ्यावर पोहोचले असून सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत धरणात 58.89 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या 24 तासांत धरणातील पाणीसाठ्यात 2.35 टीएमसी इतकी वाढ झाली आहे. धरण आता 60 टक्के भरतीच्या उंबरठ्यावर असून, आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्यास सायंकाळपर्यंत हा टप्पा पार होण्याची शक्यता धरण व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.
यंदाच्या मॉन्सूनने 29 जूनपासून सातारा जिल्ह्यात दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे कृष्णा, कोयना तसेच इतर उपनद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊन काही ठिकाणी नद्या पात्राबाहेर वाहू लागल्या होत्या. मात्र, गेल्या आठवडाभर कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने नदीपात्रातील पाणीपातळी कमी होऊ लागली होती.
शनिवारपासून पावसाने पुन्हा जोर धरल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
धरण प्रशासनाच्या माहितीनुसार, सध्या कोयना धरणात 27 हजार 129 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या 24 तासांत नवजा येथे 106 मिलिमीटर, कोयनानगर येथे 95 मिलिमीटर आणि महाबळेश्वर येथे 82 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.